नितीन गडकरींच्या घराबाहेर राडा; काँग्रेस-भाजप कार्यकर्ते आमने-सामने

नागपूर-भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या नागपूरातील घराबाहेर काँग्रेसचे आंदोलन सुरू आहे. यावेळी भाजप आणि काँग्रेस कार्यकर्ते आमने-सामने आल्याचे पाहायला मिळाले. दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी देखील केली. त्यामुळे पोलिसांचा मोठा बंदोबस्त करण्यात आला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसविरोधात केलेल्या वक्तव्यामुळे काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. बुधवारी काँग्रेस कार्यकर्त्यांनी राज्यभरात आंदोलन केले होते. मुंबईतही काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले होते. आता नागपूरमध्येही कार्यकर्त्यांनी आक्रमक भूमिका घेतल्यामुळे पोलिस सज्ज झाले आहेत.

संसदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्राला कोरोनाचा सुपर स्प्रेडर म्हटले होते. महाराष्ट्रातूनच कोरोनाचा देशभरात पसार झाला. काँग्रेसने मुंबईतील परप्रांतियांना मोफत रेल्वेचे टिकट दिले. त्यामुळे देशाची बदलली. असा आरोप मोदींनी केला आहे. त्यावरुन काँग्रेस आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. महाराष्ट्रात काँग्रेस कार्यकर्त्यांनी बुधवारी आंदोलन केले होते.

राज्यातील भाजप कार्यालयासमोर हे आंदोलन करण्यात आले. मोदींनी महाराष्ट्राचा अपमान केला असून त्यांनी महाराष्ट्रातील जनतेची माफी मागावी अशी मागणी काँग्रेसकडून करण्यात आली आहे. मोदीजी माफी मांगो अशा घोषणा आंदोलनादरम्यान देण्यात आल्या आहेत.

नितिन गडकरी यांच्या निवासस्थानबाहेर काँग्रेस करत असलेले आंदोलन खपवून घेणार नाही असे सांगत भाजप कार्यकर्त्यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. पोलिसांनी मध्यस्थी करत दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांना रोखून धरले आहे. गडकरींच्या निवासस्थानबाहेर भाजपाचे कार्यकर्ते तर रस्त्याच्या पलीकडे काँग्रेसचे कार्यकर्ते उभे आहेत. तर मध्ये पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे

Share