“घायाळ पाखरांना पंख दिले तू मुक्या वेदनांना शब्द दिले तू।

“घायाळ पाखरांना पंख दिले तू मुक्या वेदनांना शब्द दिले तू।
तुझ्याच चेतनेने जगण्यास अर्थ आला युगा युगाच्या शोषितांचा उद्धार तूच केला हे महामानवा, तुज कोटी कोटी वंदन …


“मी प्रथमतः भारतीय आहे आणि अंततः सुद्धा भारतीय आहे” . भीमराव रामजी तथा बाबासाहेब आंबेडकर एक युगपुरुष,थोर अर्थशास्त्रज्ञ ,स्त्री उद्धारक,महान कायदे पंडित,भारतीय कृषी व्यवस्थेचे जाणकार,कामगार नेते,शांततेचे पुजारी,प्रखर राष्ट्रवादी,निर्भीड आणि अभ्यासू पत्रकार,पुस्तकासाठी घर बांधणारे ग्रंथप्रेमीं,हैद्राबाद मुक्ती लढ्यातला अग्रणी, मानवी हक्काचे खंदे पुरस्कर्ते, सामाजिक न्यायाची संकल्पना मांडणारे समाजशास्त्रज्ञ, पाणी प्रश्नाचे जाणकार,नदीजोड प्रकल्पाचे प्रवर्तक,कुटुंब नियोजनाचे समर्थक,इतिहासाचे गाढे अभ्यासक ,भारतीय संविधानाचे आग्रही प्रवक्ते,प्रगल्भ राजकीय विचारवंत,कोकणातल्या चारी आंदोलनाचे महानायक,विज्ञान नि विवेकवादी समाजचिंतक,विश्वविख्यात कोलंबिया विध्यापिठाचा आतापर्यतचा सर्वात बुद्धीवान विद्यार्थी,संतती नियमासाठी र.धो.कर्वे चा खटला लढणारे वकील,जगभरातल्या उपेक्षित-शोषित-पीडित जनसमूहाचे प्रेरणास्त्रोत, बुद्ध-कबीर-फुले यांना आदर्श मानून त्यांच्या विचारांचा विस्तार मांडणारा तत्वज्ञानी,भारतीय समाजाची दुखरी नस ओळखणारा मनोवैज्ञानिक, गोलमेज परिषद गाजवणारे वाकपटू,दामोदर खोरे विकासाचे अर्धंव्यु, जलआयोग-विद्युत आयोग-श्रम आयोग स्थापन करणारे मंत्री,लोकसंख्या प्रतिबंध विधेयक मांडणारा द्रष्ट्l,परराष्ट्र धोरणाचे भाष्यकार,भारतीय रिझर्व बँक स्थापन करण्यात मोलाची भूमिका बजावणारे अर्थतज्ञ,ऊर्जा संसाधनांचे नियोजक, अशी अलौकिक-अजोड-अतुलनिय कामगिरी करणाऱ्या बाबासाहेबांचा आपण केवळ दलितांचे कैवारी आणि घटनेचे शिल्पकार म्हणूनच गौरव करणे हे अन्यायकारक आहे. अमिरीकेत न्यूयॉर्क इथे बाबासाहेबांच्या पुतळ्याखाली ज्ञानाचे प्रतीक अर्थात symbol of knowledge लिहिले आहे .अलीकडेच जपान सरकारने केंद्रीय अर्थसंकल्पातून 50 लाख रुपये खर्च करून याहोहामा शहरात पुतळा बसवला आहे.हे सर्व प्रयत्न सकारत्मक आहेत.नोबेल पुरस्कार विजेते डॉ. अमर्त्य सेन बाबासाहेबाना अर्थशास्त्रlतले आपले पिता मानतात.”Dr.Ambedkar is my father in Economics ” असे गौरवोद्गार त्यांनी 2007 मध्ये एका भाषणात काढले होते. संपूर्ण देशातील जनतेच्या मनात त्यांच्याविषयी आदर,आत्मीयता,प्रतिष्ठा होती.प्रखर देशभक्त,लोकशाहीचे प्रणेते,चारित्र्य संपन्न समाजसेवक,चिकित्सक वाचक असे बहूआयमी व्यक्तीमत्व त्यांना लाभले होते.अन्याय झाला तर त्याच्यासमोर हार मानू नका,सत्यासमोर नम्र व्हा.अन्याय करणारी व्यक्ती कितीही मोठी असो,अन्याय करणारा समाज कितीही शक्तिमान असो,त्याच्या विरुद्ध व्यक्तीने,समाजाने, झुंज दिली पाहिजे.डॉ आंबेडकरांनी दिलेला हा संदेश त्यांच्या जीवनभुवाच्या चिंतनातून व्यक्त झाला आहे. आंबेडकरांचे औपचारिक शिक्षण 1920 च्या प्रारंभी पूर्ण झाले, तेंव्हा त्यांच्या नावामागे “एम ए., पीएच.डी’.,एम.एस्सी.(अर्थशास्त्र), Barister-at law’ अशा अनेक पदव्यांची मालिका उभी होती.शिवाय वयाची तिशी येईपर्यंत त्यांना वास्तव जीवनातही असे शिक्षण मिळाले होते, जे अनेक विख्यात विद्वानांना आणि लोकांना त्यांच्या संपूर्ण आयुष्यातही मिळत नाही”.”खरोखरच आंबेडकरांनी जीवनाच्या शाळेत जे धडे गिरवले ते जगभरातल्या कोणाही विचारवंताला गिरवावे लागले नाहीत.सामाजिक भेदभावाचे चटके सोसूनही”मी प्रथमतः भारतीय आहे आणि अंततः सुद्धा भारतीय आहे” असे सच्चा देशाभिमान डॉ.आंबेडकर यांच्याकडे होता .

मिञांनो यंदा कोरोना नावाचे महाभयंकर संकट सर्व मानवजातीवर आले असल्याने आपल्याला महापरिनिर्वाणदिन जाहिर ,सार्वजनिक रित्या करता येणार नाही.आपण घरच्या घरी डाॕ. आंबेडकरांच्या प्रतिमेचे पुजन करून, आपल्याला संविधान तथा बाबासाहेबांचे पूस्तक वाचुन महापरिनिर्वाण दिनी एक दृढ संकल्प करायचा आहे. असे प्रतिमा पुजन केलेले व संविधान वाचन करताना चे फोटो एकमेकांना शेयर करायचे आहेत.
बाबासाहेबांनी आपल्याला सांगितलेल्या अनेक विचारांपैकी कमीतकमी एक विचार तरी स्विकारायचा आहे. आपल्याला फुले शाहु आंबेडकरांच्या विचारावर चालणारे अनुयायी बनायचे आहे..
बाबासाहेबांनी समाजाला तथागत गौतम बुद्धांनी सांगितलेल्या पंचशीलाचे पालन करण्याचे सांगितले आहे. आपल्याला या महापरिनिर्वाण दिनी पंचशील पालन निर्धार करायचा आहे.
पंचशील म्हणजे म्हणजे 1)अंहिसेचे पालन करणे 2) चोरी न करणे 3) व्याभिचार न करणे 4) खोट न बोलणे 5) नशा न करणे .
मिञांनो या गोष्टी गौतम बुद्धांनी सांगितल्या म्हणुन फक्त बौद्ध धर्मियांनीच त्या स्विकारायच्या असे काही नाही. जे जे लोक डाॕ. बाबासाहेबांना मानतात त्या सर्वांनी पंचशील म्हणजे काय ते समजुन घेऊन स्विकारले पाहिजे. एखादा धर्मातील चांगल्या गोष्टी स्विकारणे म्हणजे धर्मपरिवर्तन करणे नव्हे. फुले शाहु आंबेडकरी विचारांचे कार्यकर्ते जर संविधान पालन करणारे असतील तर नकीच सर्वात आधी फायदा आपलाच आहे.

बौद्ध धर्मातील सर्वात महत्त्वाचं तत्त्व आणि ध्येय म्हणजे परिनिर्वाण. परिनिर्वाण म्हणजेच म्हणजेच या शब्दाची फोड केल्यास त्यामागील अर्थ समजण्यास मदत होते. परिनिर्वाण या शब्दाचा अर्थ मृत्यू नंतर निर्वाण म्हणजेच मुक्ती असा होतो.
बौद्ध धर्म सांगतो की, आपल्या आयुष्याचं कर्म हे मृत्यूनंतरही आत्मा किंवा स्पिरीटच्या माध्यमातून पुढे जात राहते. मात्र निर्वाण स्थितीमध्ये पोहचल्यानंतर पुर्नजन्माचा विषय संपतो. अनेकदा पूर्वायुष्यातील कर्माचा आपल्या आयुष्यावर प्रभाव असतो. त्यामुळे निर्वाण स्थिती मिळवल्याने या कर्माचं ओझं पुढीच जन्मावर राहत नाही.
निर्वाण प्राप्त करणं हे अत्यंत कठीण आहे. जी व्यक्ती सत्त्विक, शुद्ध आयुष्य जगतात त्यांना ही स्थिती प्राप्त करता येते. गौतम बुद्ध यांचे निधन झाले ते मूळ महापरिनिर्वाण आहे.

६ डिसेंबर १९५६ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे दिल्लीतील त्यांच्या निवासस्थानी महापरिनिर्वाण (निधन) झाले. त्यानंतर त्यांचे पार्थिव मुंबईला राजगृहावर (दादर) आणण्यात आले. शिवाजी पार्क येथील समूद्रकिनारी असलेल्या हिंदू स्मशान भूमीमध्ये ७ डिसेंबर १९५६ रोजी १२ लाख अनुयायांसमक्ष त्यांच्यावर बौद्ध पद्धतीने अंतिम संस्कार करण्यात आला. त्यावेळी हिंदू स्मशान भूमी एवढीच त्या जागेची ओळख होती. काही वर्षांनी आंबेडकरांच्या पवित्र अस्थीवर चैत्य उभारण्यात आला. आंबेडकरांना श्रद्धांजली व आजरांजली अर्पण करण्याकरिता भारताच्या सर्व प्रांतातून लाखोंच्या संख्येचा मोठा बौद्ध जनसमूदाय मुंबई येथील चैत्यभूमी (दादर) शिवाजी पार्क येथे दरवर्षी १ डिसेंबर पासून येत असतो. दरवर्षी येणाऱ्या श्रद्धावान अनुयायांची गर्दी प्रचंड प्रमाणात वाढतच असते. 30 लाख अनुयायी बाबासाहेबांच्या अस्थिचे दर्शन घेण्यासाठी व त्यांना अभिवादन करण्यासाठी चैत्यभूमीवर येत असतात. डॉ. आंबेडकरांचे अनुयायी-विचारवंत तसेच देश-विदेशातील जनतेकरिता हे चैत्यभूमी स्मारक प्रेरणास्थान आहे.

महापरिनिर्वाण दिन किंवा महापरिनिर्वाण दिवस हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा स्मृतिदिन (पुण्यतिथी) असून तो ६ डिसेंबर रोजी आयोजित केला जातो.आंबेडकरांचे ६ डिसेंबर १९५६ रोजी दिल्ली येथे महापरिनिर्वाण (निधन) झाले होते, याच्या दुसऱ्या दिवशी ७ डिसेंबर रोजी मुंबईतील चैत्यभूमी येथे त्यांच्यावर बौद्ध पद्धतीने अंतिमसंस्कार करण्यात आले. निधनापूर्वी त्यांनी १४ ऑक्टोबर १९५६ रोजी लक्षावधी अनुयायांसह बौद्ध धर्म स्वीकारला होता, बाबासाहेब ‘बोधिसत्व’ . आंबेडकर हे बौद्ध गुरु होते, यामुळे त्यांच्या पुण्यतिथीसाठी ‘महापरिनिर्वाण’ हा बौद्ध संकल्पनेतील शब्द वापरण्यात आला आहे. महापरिनिर्वाण दिनानिमित्त १ डिसेंबर पासून मुंबईतील त्यांचे समाधीस्थळ असलेल्या चैत्यभूमी येथे भारतभरातून लक्षावधी लोक येतात. चला तर मग करूया * निर्धार करोनामुक्त जीवनाचा . मिञांनो महापरिनिर्वाणदिनी ला विश्ववंदनीय डाॕ. आंबेडकरांच्या प्रतिमेसमोर उभे राहुन घ्या शपथ की मी आयुष्यभर भारतीय संविधानाचे पालन करील.

महापरिनिर्वाण दिना- निमित्त करायच्या गोष्टी..
1) महामानव डाॕ.बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेचे पुजन.
2) आंबेडकरांच्या प्रतिमेसमोर उभे राहुन पंचशील पालनाचा निर्धार व शपथ घेणे
3) बाबासाहेबांचे पुस्तक वाचणे
4)या कोरोनाच्या संकटात शक्य असेल तसे सुरक्षितपणे गरजुंना मदत करणे…सामाजिक न्याय प्रस्थापित करण्याचे त्यांचे अलौकिक व्यक्तिमत्व होते. मानव स्वंयपूर्ण व भयमुक्त झाला पाहिजे हा त्यांचा आग्रह होता, त्यांनी दिलेल्या प्रेरणेमुळेच मानवी जीवनाला प्रतिष्ठा प्राप्त झाली आहे हे विसरता कामा नये आणि म्हणून ज्यांच्या ऋणातून आपण कधीच मुक्त होऊ शकत नाही. त्यांच्या त्यागाची आपण कधीच बरोबरी करु शकत नाही, त्यांच्या करुणे एवढी करुणा आपल्यात नाही व त्यांच्या पायांच्या धुळीचे सुद्धा आपणास सर येणारी नाही..

प्रा.निलेश इंदुमती अविनाश जाधव 7798838877,9970333399

Share