टीईटी’च्या घोटाळ्याचे धागेदोऱ्यांचे गोंदियातही?
शिक्षण विभागाने मागविली माहिती : मूळ प्रमाणपत्र पाठविणार पुणेला
गोंदिया 05- राज्यात भरती संदर्भाने विविध विभागांतील घोटाळे गेल्या काही काळात सातत्याने समोर येत आहेत. आता शिक्षक पात्रता परीक्षा(टीईटी) देखील वादात सापडली आहे. परीक्षेत अनुत्तीर्ण होवून देखील उत्तीर्ण दाखवून शिक्षकाच्या नोकरीवर असल्याचा घोटाळा समोर आला. त्यामुळे त्या प्रकरणात जिल्ह्यात देखील महाभाग आहेत काय? याची चौकशी करण्याकरिता शिक्षण विभागाने जिल्ह्यातील इयत्ता 1 ते 8 वी करिता कार्यरत शिक्षकांच्या टीईटी प्रमाणपत्राची मूळ प्रत मागविली आहे. त्याकरिता जिल्हा परिषदेने संबंधित शिक्षकांना पत्र पाठविले आहे.
कोरोना विषाणूच्या संक्रमणामुळे अर्थव्यवस्था चौपट झाली. त्यातच बेरोजगारी देखील मोठ्या प्रमाणात वाढली. या काळात शासनाकडे निधी नसल्यामुळे भरती प्रक्रिया देखील थांबविण्यात आली होती. गेल्या सहा महिन्यांपूर्वी गाडी रुळावर आली. त्यामुळे राज्य शासनाने गेल्या तीन वर्षांपासून रखडलेल्या परीक्षा घेण्याचा सपाटा सुरू केला. मात्र कधी परीक्षांच्या तारखांचा घोळ, तर कधी परीक्षांमध्ये झालेली पेपरफूट आदींमुळे भरती प्रक्रियाच रद्द झाल्या. त्यात आरोग्य, एमपीएससी, टीईटी अशा अनेक परीक्षांचा समावेश आहे. परिणामी परीक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवारांचा प्रचंड हिरमोड झाला. राज्य शासन आणि परीक्षा घेणाऱ्या यंत्रणा यांच्यावरही आरोपांचा भडीमार झाला. चालू वर्षात घेण्यात आलेल्या टीईटी अर्थात शिक्षक पात्रता परीक्षेत झालेल्या पेपरफुटीचा प्रकार घडल्यानंतर त्या प्रकरणाची चौकशी करण्यात आली. या परीक्षेतील पेपरफूट राहिली दूरच आता यापूर्वी झालेल्या परीक्षांमध्ये अनुत्तीर्ण झालेल्यांना देखील उत्तीर्ण दाखवून त्यांना नोकरी देण्यात आल्याचा प्रकार उजेडात आला.
याप्रकरणी काही वरिष्ठ अधिकाऱ्यांना देखील अटक करण्यात आली. या प्रकरणाचे धागेदोरे संपूर्ण राज्यात असल्याची शंका राज्य शासनाला आहे. त्यामुळे शिक्षण विभागाने आता 13 फेब्रुवारी 2013 नंतर टीईटी अर्थात शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण केलेल्या आणि या तारखेनंतर नोकरीवर लागलेल्या इयत्ता 1 ते 8 च्या शिक्षकांचे टीईटी परीक्षा उत्तीर्ण झालेल्या मूळ प्रमाणपत्राची प्रत मागविण्यात आली आहे. त्याकरिता शिक्षण उपसंचालक यांनी 31 जानेवारी रोजी पार पडलेल्या व्हिडीओ कॉन्फरन्सवरील बैठकीत सर्व शिक्षणाधिकाऱ्यांना सूचना दिल्या. प्राथमिक आणि माध्यमिक विभागाच्या शिक्षणाधिकारी यांनी 3 फेब्रुवारी रोजी पत्र निर्गमित करून जिल्ह्यातील शाळांना पाठविले. दोन दिवसांत टीईटी उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र शिक्षण विभागाकडे पाठवायचे असून त्यानंतर शिक्षण विभाग ते प्रमाणपत्र पडताळणीकरिता पुणे येथे पाठविणार आहे. जिल्ह्यात देखील बोगस भरतीतून शिक्षकी पेशात आलेले महाभाग आहेत की नाही, हे या पडताळणीतून समोर येणार आहे.
या शाळांतील शिक्षकांना पत्र
जिल्ह्यात जिल्हा परिषद आणि खासगी शिक्षण संस्था संचालित कायम विना अनुदानित, विना अनुदानित, अंशत: अनुदानित, अनुदानित, अल्पसंख्यांक आदी शाळांतील 13 फेब्रुवारी 2013 नंतर रुजू झालेल्या शिक्षकांची माहिती मागविण्यात आली आहे.
जिल्ह्यातील 366 शिक्षकांची यादी तयारी करण्यात आली आहे. संबंधित शाळांतील मुख्याध्यापकांना 13 फेब्रुवारी 2013 नंतर रुजू झालेल्या शिक्षकांची यादी पुरविण्यात आली आहे. संबंधित शिक्षकांना दोन दिवसांचा कालावधी टीईटी प्रमाणपत्राची मूळ प्रत जमा करण्याकरिता अवधी देण्यात आला आहे. चौकशीअंती बोगस शिक्षक आहेत काय, याची शहानिशा होणार आहे.
पी. पी. समरीत,प्रभारी शिक्षणाधिकारी, माध्यमिक,जि.प.गोंदिया