खाद्य तेलाच्या किंमती कमी होणार!
नवी दिल्ली – खाद्य तेलाच्या किंमती कमी करण्यासाठी केंद्र सरकारनं मोठा निर्णय घेतला आहे. गुरुवारी केंद्र सरकारकडून जारी झालेल्या आदेशात ६ राज्य वगळून संपूर्ण देशात खाद्य तेल आणि तेलबियांचा साठा मर्यादित करण्याचा निर्णय घेतला आहे. सरकारच्या आदेशानुसार, साठ्यावर लावण्यात आलेली मर्यादा ३० जून २०२२ पर्यंत राहणार आहे. मागील वर्षी खाद्य तेल आणि तेलबियांच्या दरात मोठी दरवाढ झाली होती. त्यामुळे सर्वसामान्य जनतेवर त्याचा परिणाम पाहायला मिळाला. वाढते दर लक्षात घेता सर्वसामान्यांना दिलासा देण्याचं काम केले आहे.
केंद्र सरकारनं म्हटलंय की, हा आदेश तात्काळ लागू झाला असून ३० जून २०२२ पर्यंत अंमलबजावणी होईल. किरकोळ विक्रेते ३० क्विंटल खाद्यतेल आणि १०० क्विंटल खाद्य तेलबियांपेक्षा अधिक साठा करू शकत नाहीत. त्याचबरोबर घाऊक विक्रेत्यांसाठी ५०० क्विंटल खाद्यतेल आणि २००० क्विंटल खाद्य तेलबियांच्या साठ्याची मर्यादा निश्चित करण्यात आली आहे. किरकोळ व्यापारी त्यांच्या दुकानात ३० क्विंटल खाद्यतेल आणि डेपोमध्ये १००० क्विंटलपर्यंत खाद्यतेलाचा साठा करू शकतात.
गेल्या वर्षी देशात खाद्यतेलाच्या किमतीत मोठी वाढ झाली होती. मोहरी तेलाच्या भावात सर्वाधिक वाढ झाली. यानंतर सरकारने मोहरीच्या तेलात मिश्रणावर बंदी घातली. त्यामुळे भाव आणखी वाढले. मात्र, वाढलेल्या किमतींपासून दिलासा देण्यासाठी सरकारने गेल्या काही महिन्यांत अनेक पावले उचलली असून, त्याचा लाभ सर्वसामान्यांना दिला जात आहे. दर पुन्हा वाढू नयेत म्हणून सरकारने पुन्हा एकदा साठा मर्यादा निश्चित केली आहे.