मुल्ला गावातील 1ली ची आरोही 15 फेब्रु.ला आकाशवाणीवर

देवरी 04- लोहारा केंद्रांतर्गत येणाऱ्या जिल्हा परिषद वरिष्ठ शाळेतील 1 पहिलीची विद्यार्थिनी आरोही रघुवंशी हिची निवड ‘शाळाबाहेरची शाळा’ उपक्रमांतर्गत निवड करण्यात आली आहे. येत्या 15 तारखेला 261 व्या भागात ती एका मुलाखतीच्या माध्यमातून आकाशवाणीवर झळकणार आहे. ही मुलाखत आकाशवाणी केंद्रावरून येत्या 15 तारखेला सकाळी 10 वाजून 35 मिनिटानी प्रसारित करण्यात येणार आहे.

विभागीय आयुक्त यांच्या प्रेरणेने, प्रादेशिक विद्या प्राधिकरण नागपूर आणि प्रथम फाउंडेशनतर्फे विद्यार्ध्यांच्या शिक्षणात कोरोना काळात खंड पडू नये व विद्यार्थ्यांनी स्वयंअध्यन करण्याच्या उद्देशाने शाळाबाहेरची शाळा हा शैक्षणिक उपक्रम राबविला होता. या अंतर्गत विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासासाठी कृतियुक्त आणि परिसरातील उपलब्ध स्त्रोतांच्या वापर करून विद्यार्थी आपला विकास कसे साधतील, यासाठी राज्यभर उपक्रम घेतले जात आहेत. यानुसार वर्गनिहाय कार्य आठवड्याला दिले जाते. या कृतिची माहिती सर्वांना व्हावी , यासाठी एखाद्या विद्यार्थ्याची निवड आकाशवाणीवर बोलण्यासाठी केली जाते. या उपक्रमांतर्गत मुल्ला शाळेच्या आरोही या पहिल्या वर्गाच्या चिमुकल्या विद्यार्थिनीला ही संधी उपलब्ध झाली.

आरोहीच्या या यशाबद्दल गोंदिया जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी महेंद्र मोटघरे, मुल्लाचे सरपंच कृपासागर गौपाले, नवनिर्वाचित पंस सदस्य अनिल बिसेन, केंद्रप्रमुख सत्यवान गजभिये, मुख्याध्यापक राज चौबे, शिक्षिका प्रभा कुंभलकर , शाऴा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अनिल सोनवाने आदींनी कौतुक करून अभिनंदन केले आहे.

Print Friendly, PDF & Email
Share