रेल्वे स्थानकावर ‘रेस्टॉरंट ऑन व्हील’; नागपूर मंडळात पहिलाच उपक्रम

नागपूर : तुम्ही रेल्वेच्या प्रवासात नसला, तरी रेल्वे बोगिमध्ये जाऊन जेवण करू शकता. नागपूरच्या मध्यवर्ती रेल्वे स्थानकाच्या प्रांगणात ‘फाईव्ह स्टार’ हॉटेलची व्यवस्था एका रेल्वेच्या बोगित करण्यात आली आहे. बोगीच्या आतमध्ये गेल्यावर फाइव्ह स्टार हॉटेलचा अनुभव प्रवांशाना येणार आहे. चोवीस तास सुरू राहणाऱ्या हॉटेलमध्ये साऊथ इंडियनसह उत्तर भारतीय आदी खाद्य पदार्थ मिळणार आहेत.

नागपूर मंडळाच्या मध्य रेल्वे विभागाने खाण्याची मेजवानी अभिनव उपक्रमाच्या माध्यमातून प्रवाशांना उपलब्ध व्हावी म्हणून ‘रेस्टॉरंट ऑन व्हील’ ही संकल्पना पुढे आणली. उपयोगात नसलेली बोगी नागपूर रेल्वे स्थानकाच्या समोर बसविण्यात आली. या बोगिच्या आतमध्ये फाइव्ह स्टार हॉटेलमध्ये राहतात, अशा टेबल आणि खुर्च्या बसविण्यात आल्या. महत्त्वाचे म्हणजे झुंबर, लायटिंग आणि आतमधील सजावटीने हॉटेल इतक्या आकर्षक पद्धतीने सजविण्यात आले की, प्रवाशांना बोगित बसल्याचा अनुभव नाही तर एका फाइव्ह स्टार हॉटेलमध्ये बसून जेवण करीत असल्याचा भास होणार आहे. त्या सोबतच रेल्वेची थीम येणारी बैठक व्यवस्था सुद्धा आकर्षणाचा केंद्र आहे. विविध व्यंजनांनी येथील स्वयंपाकगृह सज्ज राहणार असून कर्मचारी सुद्धा हॉटेलच्या ड्रेस कोडमध्ये दिसणार आहेत.

प्रवाशांची पसंती नागपूर रेल्वे स्थानकावर ऐतिहासिक भोजनालय प्रवाशांसाठी बनविण्यात आल्याने हा उपक्रम मध्य रेल्वे मंडळाचा नागपूर विभागात पहिलाच आहे. या हॉटेलमध्ये ४० लोकांना बसण्याची व्यवस्था आहे. आतमधून बोगिला सजविताना नागपूरच्या महत्त्वपूर्ण स्थानाच्या बाबतीत विचार करण्यात आला आहे. प्रवाशांनी सुद्धा या हॉटेलला पसंती दर्शविली आहे.

मध्य रेल्वेच्या विभागीय रेल्वे व्यवस्थापक ऋचा खरे यांनी हॉटेलचे आज निरीक्षण केले. यावेळी अतिरिक्त विभागीय रेल्वे व्यवस्थापक (प्रशासन) पी.एस. खैरकर, अतिरिक्त विभागीय रेल्वे व्यवस्थापक (टी) जय सिंह, वरिष्ठ विभागीय व्यावसायिक व्यवस्थापक कृष्णनाथ पाटील यावेळी उपस्थित होते.

Share