विद्यार्थी आंदोलनाचा सूत्रधार ‘हिंदुस्थानी भाऊ’ला नागपुरात आणणार

नागपूर: राज्य सरकारच्या निर्णयाविरोधात विद्यार्थ्यांना रस्त्यावर उतरून आंदोलन करण्यासाठी प्रोत्साहन देणाऱ्या हिंदुस्थानी भाऊवर नागपुरात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपासासाठी त्याला नागपुरात आणले जाणार आहे. मुंबईतील हिंदुस्थानी भाऊ ऊर्फ विकास फाटक याच्या चिथावणीवरून विद्यार्थ्यांनी ‘दहावी आणि बारावीच्या परीक्षा ऑफलाइन घेऊ नये’, या मागणीसाठी सोमवारी दुपारी मेडिकल चौकात आंदोलन केले.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबईतील हिंदुस्थानी भाऊच्या म्हणण्याला बळी पडून शेकडो विद्यार्थ्यांनी ‘दहावी आणि बारावीच्या परीक्षा ऑफलाइन घेऊ नये’, या मागणीसाठी सोमवारी दुपारी मेडिकल चौकात आंदोलन केले. याची कोणतीही परवानगी घेण्यात आली नव्हती. विद्यार्थ्यांनी मनपाच्या बसची तोडफोड करून आंदोलनाला हिंसक वळण दिले. त्यामुळे अजनी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भाऊला मुंबई पोलीसांनी अटक केली असून त्याला तीन दिवसांची पोलीस कोठडी मिळाली आहे. परंतु, भाऊविरुद्ध नागपुरातही गुन्हा दाखल करण्यात आल्यामुळे नागपूर पोलीस त्याला अटक करून नागपुरात आणणार आहेत.

आंदोलनकर्त्या युवकांविरूद्ध पोलीस कारवाई करणार आहेत. सीसीटीव्ही फुटेज आणि सोशल मीडियावर फिरत असलेल्या चित्रफिती, छायाचित्रांवरून पोलीस युवकांचा शोध घेत आहेत. असे आंदोलन परत होऊ शकते, याची कल्पना पोलीसांना आली असल्यामुळे पोलिसांनी यासंदर्भात पूर्वतयारी केलेली आहे. गैरकायदेशीररीत्या आंदोलन करणाऱ्यांवर पोलीस गुन्हे दाखल करणार आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांचे भविष्य खराब होऊ नये म्हणून विद्यार्थ्यांनी आंदोलनात सहभागी न होण्याचे आवाहन पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी केले आहे.

Share