गुड न्यूज : 426 महिला पोलिसांना आता 8 तासाची ड्युटी

◾️गोंदिया पोलिस दलातील 426 महिला पोलिस कर्मचारी व वर्ग दोनच्या सहा अधिकारी महिलांना लाभ

गोंदिया 01: कुटुंबाची आणि नोकरीची जबाबदारी पेलवणाऱ्या महिला पोलिसांना 12 तास ड्युटी केल्याने त्याचा परिणाम कौटुंबिक जबाबदारीवर होत होता . याचा विचार करून राज्यातील महिला पोलिस अंमलदारांसाठी 8 तासांची ड्युटी करण्याचा निर्णय शासनस्तरावर घेण्यात आला आहे. महाराष्ट्र पोलिस दलाचे महासंचालक संजय पांडे यांनी याबाबतचे 27 जानेवारी रोजी परिपत्रक जारी केले आहे. गोंदिया पोलिस दलातील 426 महिला पोलिस कर्मचारी व वर्ग दोनच्या सहा अधिकारी महिलांना लाभ मिळणार आहे.

पोलिस दलात मोठ्या संख्येने महिला कर्तव्य बजावत असतात. महाराष्ट्रातील सर्व जिल्हा पोलिस दलात याची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. महिला अंमलदारांचे किमान 4 तास कर्तव्याचे कमी होणार असून महिलांसाठी हा सुखद क्षण असणार आहे. या महिलांना कर्तव्यासोबत कौटुंबिक जबाबदारीही पार पाडावी लागते. पोलिस खात्यात 12 तासांची कर्तव्य असले तरी विशेष बंदोबस्त, आंदोलन, मोर्चे यामुळे तसेच सण-उत्सावांमुळे कर्तव्याचे तास निश्चित नसतात. या काळात महिला अंमलदारांना अनेक पेचप्रसंगांना सामोरे जावे लागत होते. महिला अंमलदारांना कर्तव्यासोबत कौटुंबिक जबाबदारीचा ताळमेळ बसण्यासाठी वेळेचे नियोजन करणे गरजेचे आहे. सदर बाब लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आल्याचे परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे.

गोंदिया पोलिस दलात 426 महिला पोलिस कर्मचारी कार्यरत आहेत. यामध्ये 26 पोलिस हवालदार, 107 पोलिस नाईक, 293 पोलिस शिपाई यांचा समावेश आहे. महिला सहाय्यक पोलिस निरीक्षक 1, महिला पोलिस उपनिरीक्षक पदी 5 महिला अधिकारी कार्यरत आहेत. या सर्व महिला पोलिस कर्मचारी व अधिकार्‍यांना याचा लाभ होणार असून पोलिस विभागाच्या या निर्णयाने महिला पोलिस कर्मचारी व अधिकारी यांच्यासह कुटुंबांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

Print Friendly, PDF & Email
Share