वनरक्षक, वनमजूर एसीबीच्या जाळ्यात

गडचिरोली १: वडिलोपार्जित अतिक्रमीत जमिनीवर बांध घालून ती शेतीयोग्य करण्याच्या कामाकरिता एका शेतकऱ्याकडून २२ हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाललुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी आज धानोरा तालुक्यातील रांगी(उत्तर) बिटाचा वनरक्षक रणजित प्रभुलाल कुडावले(५०) व वनमजूर देवराव रामचंद्र भोयर(५२) यांना रंगेहाथ पकडून अटक केली.

एसीबीने दिलेल्या माहितीनुसार, तक्रारकर्त्या शेतकऱ्यास वडिलोपार्जित अजिक्रमीत जमिनीवर बांध टाकून शेती करायची होती. त्यासाठी त्याने रांगी येथील वनविभागाकडे अर्ज केला. परंतु वनरक्षक रणजित कुडावले याने त्यास पंचांसमक्ष ३० हजार रुपयांची मागणी केली. तडजोडीअंती तो २२ हजार रुपये स्वीकारण्यास तयार झाला. मात्र, लाच देण्याची तक्रारकर्त्याची मूळीच इच्छा नसल्याने त्याने गडचिरोली येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांकडे तक्रार केली. त्यानुसार या विभागाच्या अधिकाऱ्यांनी आज रांगी येथे सापळा रचला. यावेळी रांगी-जांभळी रस्या्यवर तक्रारकर्त्याकडून वनमजूर देवराव भोयर याच्यामार्फत २२ हजार रुपयांची लाच स्वीकारताना रणजित कुडावले यास रंगेहाथ पकडले. त्याच्यावर धानोरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक सुरेंद्र गरड, पोलिस निरीक्षक यशवंत राऊत, सहायक फौजदार प्रमोद ढोरे, हवालदार नथ्थू धोटे, शिपाई किशोर जौंजाळकर, श्रीनिवास संगोजी, राजू पद्मगिरवार, स्वप्नील बांबोळे, किशोर ठाकूर, संदीप घोरमोडे, संदीप उडाण, विद्या म्हशाखेत्री, ज्योत्नाघर वसाके, तुळशीराम नवघरे आदींनी ही कारवाई केली.

Share