पक्ष्यांची शिकारी टोळी वन विभागाच्या जाळ्यात | 49 पक्षी, 6 मोटारसायकल व 5 मोबाईल जप्त

लाखांदूर वनविभागाची सापळा कारवाई

भंडारा : लाखांदूर तालुक्यातील काही भगत पक्ष्यांची शिकारी टोळी सक्रिय असल्याची माहिती वन विभागाला मिळाली. त्यावरून जंगली पक्ष्यांची शिकार करणार्‍या टोळीवर वन कर्मचार्‍यांनी सापळा कारवाई करीत 14 शिकार्‍यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून विविध जातीच्या तब्बल 49 पक्ष्यांसह सहा मोटारसायकल व पाच मोबाईल जप्त करण्यात आले. सदर कारवाई 30 जानेवारी रोजी रात्री 9.30 वाजताच्या सुमारास लाखांदूर वनपरिक्षेत्रातील दिघोरी अंतर्गत रोहिणी शेतशेशिवारात करण्यात आली.

हिवाळ्याच्या दिवसात अनेक स्थानांतरित पक्षी भंडारा जिल्ह्यात येतात. या संधीचा फायदा घेत पक्ष्यांची शिकारी टोळी कडून मोठ्या प्रमाणात त्यांची शिकार देखील केल्या जाते. लाखांदूर तालुक्यातील काही भागात शिकार्‍यांची टोळी सक्रिय असल्याची माहिती वनविभागाला मिळाली.

मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे 30 जानेवारी रोजी रात्रीच्या सुमारास सापळा रचण्यात आला. यावेळी लाखांदूर वनपरिक्षेत्रातील सहवनक्षेत्र दिघोरी अंतर्गत येणार्‍या तिरखुरी लगत रोहिणी गावाबाहेरील शेत शिवारात काही शिकारी जंगली पक्ष्यांची शिकार करण्याकरिता जाळे घेऊन आले होते. त्या दरम्यान शिकार्‍यांनी त्यांच्या मोटरसायकली रोहणी-पाहूणगाव रस्त्यावर ठेवल्याचे वन कर्मचार्‍यांना दिसून आले.

अशी केली सापळा कारवाई 

यावेळी कर्मचार्‍यांनी कारवाईकरिता दबा धरून बराच वेळ पक्ष्यांची शिकारी टोळी कधी येणार, याची प्रतिक्षा केली. एक ते दीड तासांनतर चौदा व्यक्ती विविध पक्ष्यांची शिकार करून त्यांच्या मोटरसायकल जवळ आले. नेमक्या त्याच वेळी वन कर्मचार्‍यांनी धाड टाकली व सर्व शिकार्‍यांना ताब्यात घेतले. हे सर्व शिकारी धर्मापुरी पु /टोली येथील रहिवासी आहेत.

मृत व जिवंत पक्ष्यांसह इतर साहित्य जप्त 

त्यांच्याकडून वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972 मधील अनुसूची सू -4 मध्ये असलेल्या कवड्या उर्फ कॉलर डॉव 42 जिवंत व 3 मृत, दोन मोठे व एक लहान मैना असे एकूण 49 पक्षी तसेच शिकारी करण्याकरिता वापरण्यात आलेले नायलॉन जाळे, तीन लांब बास तसेच सहा मोटरसायकल, पाच मोबाईल जप्त करण्यात आले. सर्व आरोपींविरुद्ध वन्य जीव संरक्षण अधिनियम अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. 

ही कारवाई लाखांदूर क्षेत्र सहायक अधिकारी आर.जी. निर्वाण, जी.डी. हत्ते, एम.ए. भजे, पी.बी. डोले, एस.जी. खंडागळे, बी.एस. पाटील, आर.ए. मेश्राम, प्रफुल राऊत, पोलिस पाटील नंदकिशोर मेश्राम, वनमजूर विकास भुते यांनी केली. सदर प्रकरणाचा तपास भंडारा वनविभागाचे उपवनसंरक्षक एस.बी. भलावी, सहाय्यक वनरक्षक आर.बी. राठोड यांच्या मार्गदर्शनात लाखांदूर वनपरिक्षेत्र अधिकारी रुपेश गावित करीत आहेत.

Share