10वी-12वी साठी शाळा तिथे परीक्षा केंद्र! एका वर्गात 25 विद्यार्थी बसणार
कोरोनाचा संसर्ग आता कमी होऊ लागला असून अभ्यासक्रमदेखील पूर्ण शिकवून झाला आहे. त्यामुळे ठरलेल्या वेळापत्रकानुसारच परीक्षा होतील, यादृष्टीने माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळाने तयारी केली आहे. पण, कोरोनाचा धोका पूर्णपणे टळला नसल्याने ‘शाळा तिथे परीक्षा केंद्र’ या संकल्पनेनुसार विद्यार्थ्यांना सोयीच्या ठिकाणी परीक्षा देता येईल, असे नियोजन केले जात आहे.
शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड, राज्यमंत्री बच्चू कडू यांच्यासह शिक्षण आयुक्त व माध्यमिक शिक्षणचे संचालक, यांच्यासह इतर अधिकाऱ्यांची 26 जानेवारीला बैठक पार पडली. त्यावेळी शिक्षणाधिकाऱ्यांचा अभिप्राय जाणून घेण्यात आला. त्यांच्या म्हणण्यानुसार सध्या दहावी-बारावीचा 90 टक्क्यांपर्यंत अभ्यासक्रम शिकवून पूर्ण झाला असून परीक्षेपूर्वी तो शिकवून पूर्ण होणार आहे. विद्यार्थी, पालक व शिक्षकांच्या मानसिकतेचा विचार केला असता, वेळापत्रकानुसारच परीक्षा होईल, असे चित्र आहे. दहावी-बारावीचा निकाल वेळेत जाहीर होऊन विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वेळेत सुरु व्हावे, यादृष्टीने शालेय शिक्षण विभागाचे नियोजन आहे.
परीक्षा लांबल्यास कडक उन्हाळ्यात परीक्षा देण्याची विद्यार्थ्यांची मानसिकता राहणार नाही, असेही तज्ज्ञांचे मत आहे. मात्र, राज्यमंत्री बच्चू कडू यांनी विद्यार्थ्यांची परीक्षा एप्रिलमध्ये घ्यावी, अशी मागणी केली. त्यामुळे विद्यार्थी व पालकांमध्ये संभ्रम निर्माण झाला असून त्यासंदर्भात दोन-तीन दिवसांत अंतिम निर्णय अपेक्षित आहे. तरीही, परीक्षा पुढे ढकलू नये, या मागणीवर विद्यार्थी, पालक, शिक्षक ठाम आहेत. कोरोनाच्या स्थितीचा विचार करता विद्यार्थ्यांना जवळील शाळेतूनच परीक्षा देता येईल, यादृष्टीने बोर्डाने तयारी सुरु केली आहे.
परीक्षेसंबंधी ठळक बाबी…
- – दहावी परीक्षेसाठी 16.23 लाख तर बारावीसाठी 14.70 लाख विद्यार्थी
- – एका वर्गात झिगझॅग पध्दतीने 25 विद्यार्थ्यांची असेल बैठक व्यवस्था
- – सध्या परीक्षेसाठी आठ हजार केंद्रे, पण शाळा तिथे असतील परीक्षा केंद्रे
- – राज्यभरात दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी 31 हजार परीक्षा केंद्रांचे नियोजन
- – उन्हाळा अन् पुढे पावसाळा असल्याने परीक्षा वेळापत्रकानुसारच घेण्यावर बोर्ड ठाम
”दहावी-बरावीची परीक्षा वेळापत्रकानुसार घेण्याच्या दृष्टीने सर्व तयारी झाली आहे. तत्पूर्वी, पालक, विद्यार्थी आणि शिक्षक व शिक्षणाधिकाऱ्यांची मते जाणून शिक्षण मंत्री निर्णय घेतील. एका वर्गात 25 विद्यार्थी बसतील, अशी व्यवस्था केली जाणार असून कोरोनाची स्थिती पाहता परीक्षा केंद्रे आणखी वाढतील.”
– शरद गोसावी, अध्यक्ष, माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळ