कोका जंगलातील रुद्रा वाघाची शिकार

भंडारा 28: भंडारा वनपरिक्षेत्रातंर्गत पलाडी गावाजवळ एका शेतात पूर्ण वाढ झालेला जवळपास 5 वर्ष वयाचा रुद्रा बी-2 नावाचा वाघ मृताव्यस्थेत आढळला. रानडुक्करांच्या शिकारीसाठी लावलेल्या विजेच्या सापळ्यात सापडून वाघाचा मृत्यू झाल्याचा संशय वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला. भारदस्त अशा वाघाच्या मृत्यूमुळे वन्यजीवांचे मोठे प्रमाणात नुकसान झाले असून हळहळ व्यक्त केली जात आहे.

मागील वर्षी भंडारा वनविभागांतर्गच वाघांच्या दोन बछड्यांचा कालव्यामध्ये बुडून मृत्यू झाला होता. त्यानंतर लावण्यात आलेल्या कॅमेऱ्यांच्या माध्यमातून वाघांच्या हालचालींवर नजर ठेवली जात होती. याच दरम्यान हा वाघ भंडारा वनपरिक्षेत्रांतर्गतच वावरत असल्याचे लक्षात आले. रुद्रा बी-टू या नावाने ओळख निर्माण केलेल्या या वाघाची शेवटची हालचाली 22 जानेवारी रोजी संध्याकाळी 6 वाजता सुमारास लावण्यात आलेल्या ट्रॅप कॅमेऱ्यात कैद झाल्या होत्या. आज 28 रोजी सकाळी हा वाघ पलाडी जवळील वंजारी यांच्या फार्महाऊस शेजारील शेतात मृताव्यस्थेत आढळून आला.

वनविभागाच्या अधिकाऱ्यांना याची माहिती दिल्यानंतर उपवनसंरक्षक भलावी, जिल्हा टायगर सेलचे अध्यक्ष व पोलिस अधीक्षक वसंत जाधव, सहायक उपवनरसंरक्षक नागूलवार, भंडारा परिक्षेत्राचे वनपरिक्षेत्रधिकारी विवेक राजूरकर, अतिरिक्त पोलिस अधीक्षक अनिकेत भारती, मानद वन्यजीव सचिव नदीम खान यांच्यासह वनविभागाचे अन्य अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. प्रत्यक्ष घटनास्थळाची पहाणी केल्यानंतर वाघाचा मृत्यू हा वन्यप्राण्यांच्या शिकारीसाठी लावलेल्या विजेच्या सापळ्यात अडकून झाल्याचे स्पष्ट झाले. घटनास्थळी इलेक्ट्रिक प्रवाहासाठी लावलेल्या कुंपनाचे खड्डे दिसून आले. ज्या ठिकाणी वाघ मृताव्यस्थेत आढळून आला त्याच्यावरून 11 केव्ही ची विजेची लाईट गेली आहे हे विशेष!

घटनास्थळावर पंचनामा केल्यानंतर शवविच्छेदनासाठी गडेगाव येथील वनविभागाच्या आगारात नेण्यात आला. रात्री उशिरा शवविच्छेदन झाल्याचे समजते. या वाघाच्या मृत्यूमुळे भंडारा जिल्ह्यातील वन्यजीवप्रेमींनी हळहळ व्यक्त केली आहे.

Share