विद्यार्थ्यांच्या गणवेशाच्या रक्कमेत 50% कपात

देवरी 28: तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेतील समग्र शिक्षा अंतर्गत दरवर्षी पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना दोन गणवेश वितरीत केले जातात. मात्र, मागील वर्षी सारखेच यंदा ही कोरोनाचा फटका विद्यार्थ्यांच्या गणवेशाला बसला आहे. शासनाने यंदा गणवेश खर्चात तब्बल 50 टक्क्यांनी कपात केली असल्यामुळे एकाच गणवेश विद्यार्थ्यांना देण्यात येत आहे. त्यामुळे शिक्षकांसह शाळा व्यवस्थान समितीची डोकेदुखी वाढली आहे.

शैक्षणिक सत्र 2021-22 करिता मोफत गणवेश योजनेच्या अंदाजपत्रकास मंजुरी देण्यात आली आहे. वर्ग पहिली ते आठवीच्या सर्व अनुसूचित जाती जमाती, विमुक्त व भटक्या जाती, ओबीसी संवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील मुलांना मोफत गणवेश योजनेचा लाभ देण्यात येतो. मागील वर्षी प्रती विद्यार्थी दोन गणवेशाप्रमाणे 600 रुपये शालेय व्यवस्थापन समितीच्या खात्यावर जमा करण्यात आले होते.

मात्र, यावर्षी एकच गणवेश देण्यात येत आहे. त्यासाठी 300 रुपये अनुदान शाळा व्यवस्थापन समितीच्या खात्यावर वळती करण्यात येत आहेत. मात्र, गणवेश निधीला कात्री लावण्यात आल्याने पालकांकडून शिक्षक व व्यवस्थापन समितीच्या पदाधिकार्‍यांना विचारणा करण्यात येत असताना कमी रक्कमेत दर्जेदार गणवेश कसा खरेदी करावा असा प्रश्न व्यवस्थापन समितीला पडला आहे. मंजूर निधी शालेय व्यवस्थापन समितीच्या खात्यावर लाभार्थ्यांच्या संख्येनुसार दिला जाणार आहे. त्यामुळे व्यवस्थापन समितीच्या स्तरावरून गणवेश पुरवठा करण्याची कार्यवाही होणार आहे.

Print Friendly, PDF & Email
Share