टीईटी परीक्षेत अपात्र ठरलेल्या तब्बल ७ हजार ८०० परीक्षार्थींना पैसे घेऊन केले पास
◾️पोलीस तपासात धक्कादायक माहिती उघड
पुणे : राज्यात परीक्षा घोटाळा समोर येत असताना आता टीईटी परीक्षा घोटाळा प्रकरणात धक्कादायक आणि खळबळजनक माहिती समोर आली आहे. टीईटी परीक्षेत आपात्र ठरलेल्या तब्बल 7 हजार 800 परीक्षार्थींना पैसे घेऊन पास केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. या वृत्ताने आता एकच खळबळ उडाली आहे.
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने 2019-20 मध्ये घेतलेल्या शिक्षक पात्रता परीक्षेमध्ये अपात्र ठरलेल्या तब्बल 7 हजार 800 परीक्षार्थींकडून पैसे घेऊन त्यांना पात्र ठरविल्याचे समोर आले आहे. सायबर पोलिसांनी केलेल्या तपासात हे धक्कादायक माहिती उघड झाली आहे. 2018 मधील परीक्षेमध्येही मोठ्या प्रमाणावर अपात्र परीक्षार्थींकडून पैसे घेऊन पात्र ठरविले असून त्याची पडताळणी सुरू आहे.प्रकरणाचा तपास करीत असताना राज्य परीक्षा परिषदेकडून मूळ निकाल आणि प्रत्यक्ष जाहीर केलेला निकाल याची पडताळणी सायबर पोलिसांनी केली. 2019-20 च्या परीक्षेत एकूण 16 हजार 592 परीक्षार्थींना पात्र करण्यात आले आहे. प्रत्यक्षात पोलिसांनी दोन्ही निकाल पडताळून पाहिल्यावर त्यातील तब्बल 7 हजार 800 परीक्षार्थी हे अपात्र असल्याचे समोर आले. तरीही त्यांना निकालामध्ये पात्र ठरविण्यात आल्याचे दिसून आले.
टीईटी परीक्षा घोटाळा प्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून पोलिसांनी आतापर्यंत मोठे घबाड जप्त केले. टीईटी परीक्षा गैरव्यवहार प्रकरणी अश्विन कुमार याला कर्नाटकातील बंगळुरू येथून अटक केली आहे. त्यानंतर त्याच्या घराची पोलिसांनी झाडाझडती घेतली असता पोलिसांना मोठं घबाड आढळून आलं आहे. अश्विन कुमार याच्या घरातून 25 किलो चांदी आणि 2 किलो सोन जप्त करण्यात आले आहे. पुणे पोलिसांच्या टीमने अश्विन कुमार याच्या बंगळुरू येथील घरी झाडाझडती केली असता हे घबाड सापडलं
टीईटी पेपरफुटी प्रकरणी पोलिसांनी काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे यांना अटक केली. पोलिसांनी सुपे यांच्या घरी टाकलेल्या धाडीत लाखोंचा मुद्देमाल आढळला होता. यानंतर आता पोलिसांनी सुपे यांच्या घरी आणखी एक धाड टाकली आहे. यामध्ये पोलिसांच्या हाती मोठे घबाड लागले आहे. छापेमारीत आरोपी सुपे याच्या घरात पोलिसांना दोन कोटीहून अधिक रुपयांची रक्कम आणि लाखो रुपये किमतीचे सोन्याचे दागिने आढळले.