प्रजासत्ताक दिनी संचलनात महाराष्ट्राच्या चित्ररथाला ‘नो एन्ट्री’, आरोप-प्रत्यारोप सुरु

प्रजासत्ताक दिनी (26 जानेवारी) दिल्लीतील राजपथावर लष्कराच्या पथसंचलनानंतर मोठ्या दिमाखात राज्यांचे चित्ररथ येत असतात. त्यातून भारतीय संस्कृतीचं दर्शन साऱ्या जगाला होतं. या संचलनात महाराष्ट्राचा चित्ररथ नेहमीच लक्षवेधी ठरला असून, अनेकदा महाराष्ट्राने पुरस्कारही मिळवले आहेत. यंदा ‘महाराष्ट्रातील जैवविविधतेची मानके’ या विषयावर आधारित चित्ररथ बनवला होता. मात्र, केंद्र सरकारने यंदा महाराष्ट्राच्या चित्ररथाला परवानगी नाकारल्याचे समोर येतेय. सुरक्षेच्या कारणावरुन संरक्षण मंत्रालयाने महाराष्ट्रासह पश्चिम बंगाल, केरळ व बिहारच्या चित्ररथांना परवानगी नाकारली आहे.

राजकीय आरोपप्रत्यारोप
दरम्यान, त्यावरुन आता राजकीय आरोप-प्रत्यारोपांना सुरुवात झालीय. शिवसेनेचे खासदार संजय राऊत म्हणाले, की “महाराष्ट्राला डावलून केंद्र सरकारला कोणता घोडा पुढे सरकवायचा आहे..? हे काँग्रेस राजवटीत घडले असते, तर महाराष्ट्र भाजपने बोंबाबोंब केली असती. आज गप्प का..?”

राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या, की “प्रजासत्ताक दिन हा देशाचा उत्सव असून, केंद्र सरकारने सर्व राज्यांना प्रतिनिधित्व देणे अपेक्षित असतं, परंतु केंद्र सरकार आकसाने वागत असून, विरोधकांची सत्ता असणाऱ्या राज्यांना सापत्न वागणूक देतंय.”

केंद्र सरकारचा खुलासा
राजपथावर चित्ररथांना परवानगी देण्यासाठी, केंद्राची तज्ज्ञ समिती असते. ही समिती विविध राज्य आणि केंद्राच्या मंत्रालयाकडून आलेल्या प्रस्तावांची छाननी करून त्यांना परवानगी देत असल्याचे केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे.

Share