बोगस लस प्रमाणपत्र प्रकरणी आरोग्य अधिकाऱ्याला बेड्या

धुळे : धारावीनंतर आणखी एका बोगस लसीकरण प्रमाणपत्र देणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. यानंतर पोलीस यंत्रणा एक्शन मोडवर आली. धक्कादायक बाब म्हणजे या रॅकेटमध्ये महानगरपालिकेच्या आरोग्य अधिकाऱ्याचा समावेश होता. पोलिसांनी या प्रकरणी धुळे महानगरपालिकेचा आरोग्य अधिकारी डॉ. महेश मोरेला अटक केली आहे.
पोलिसांसोबत जाणारा हा आरोपी कुख्यात गुंड किंवा मवाली नाही. मात्र त्यानं केलेला कारनामा एखाद्या गुंडापेक्षाही कमी नाही. महापालिकेतील आरोग्य अधिकारी. बोगस लसीकरण प्रमाणपत्र प्रकरणी पोलिसांनी महेश मोरेला बेड्या ठोकल्या आहेत.
महेश मोरे, त्याचा सहकारी डॉ. प्रशांत पाटील, उमेश पाटील आणि अमोल पाथरे या चौघांनी धुळे शहरात लसीकरणाचे एक बोगस केंद्र सुरू केले होते.

इच्छुकांना या केंद्रातून लसीकरणाचे बोगस प्रमाणपत्र दिले जायचे. त्याबदल्यात त्यांच्याकडून हजारो रूपये घेतले जायचे. एका वृत्तसंस्थेने या रॅकेटचा पर्दाफाश केल्यानंतर पोलिसांनी मुख्य सुत्रधाराला अटक केली.
केवळ धुळे जिल्हाच नव्हे, तर अगदी मालेगावातील लोकांनाही या टोळक्याने बोगस प्रमाणपत्र दिल्याचे एका वृत्तसंस्थेने उघड केले होते. मोरेच्या अटकेतून भ्रष्टाचारी कीड आरोग्यविभागात किती खोलवर पोहचलीये हे स्पष्ट होतेय. आता याप्रकरणाचे धागेदोरे महाराष्ट्रात कुठे कुठे विणले गेलेत याचा शोध पोलीस घेत आहेत.

Share