देवरी येथे शेळीपालन, कुक्कुटपालन व दुग्धव्यवसाय प्रशिक्षणाचे आयोजन
■ कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात आयोजन
देवरी १३: आधार उद्योग प्रशिक्षण केंद्राच्या वतीने बुधवार(ता.१२ जानेवारी) रोजी देवरी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात एक दिवसीय शेळीपालन, कुक्कुटपालन व दुग्धव्यवसाय प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते
या प्रशिक्षणाचे उदघाटन कृषी बाजार समितीचे सभापती रमेश ताराम, राष्ट्रवादी काँग्रेस चे तालुका अध्यक्ष सी.के. बिसेन, सचिव लोकेश सोनुने, आधार उद्योग प्रशिक्षण केंद्राचे मुख्याधिकारी शंकर लाखे, डॉ.विकास शिंगाडे, बालाजी राउत यांच्या सह कृषी उत्पन्न बाजार समितीचे सर्व कर्मचारी वृन्द व तालुक्यातील बहुसंख्य शेतकरी वर्गाच्या प्रमुख उपस्थित पार पडले.
या प्रशिक्षणामध्ये शेळ्या, गाय, म्हैशी व कोंबड्या च्या जाती, त्यांच्यावरील आजार, उपचार, लसीकरण, गोठा व्यवस्थापन या विषयी डॉ.विकास शिंगाडे यांनी उपस्थित शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन केले. तर मुख्याधिकारी शंकर लाखे यांनी शासकीय योजना,विविध महामंडळाची माहिती व व्यवसायाकरिता कर्जाला लागणारे विवीध कागदपत्र या विषयी माहीती दिली आणि सभापती रमेश ताराम यांनी आपल्या तालुक्यातील शेतकरी वर्गाने शेळीपालन, कुक्कुटपालन व दुग्धव्यवसायात पुढे येऊन याचा लाभ घ्यावा असे आवाहन केले तर सचिव लोकेश सोनुने यांनी लहान-लहान उद्योग व्यवसाय काळाची गरज असून शेतकरी वर्गाने मोठ्या संख्येने यात सहभाग घेऊन उद्योग व्यवसाय सुरू करावे असे म्हटले.
तालुक्यातील बहुसंख्य शेतकरी वर्गाने या प्रशिक्षणात सहभाग घेऊन याचा लाभ घेतला.