जिल्हा परिषदेच्या १७ तर खासगी १५ अशा ३२ शिक्षकांच्या टीईटीच्या मूळ प्रमाणपत्राची होणार पडताळणी

गोंदिया : पहिली ते पाचवी आणि सहावी ते आठवी वर्गांवर १३ फेब्रुवारी २०१३नंतर नियुक्त शिक्षकांची माहिती तसेच टीईटीच्या मूळ प्रमाणपत्र पडताळणीचे आदेश राज्य परीक्षा परिषदेने दिले आहेत. त्यानुसार जिल्ह्यातील गुरूजींची पडताळणी होणार आहे. त्यामुळे गैरप्रकारातून पदस्थापना मिळवलेल्या गुरुजींनी देव पाण्यात ठेवले आहेत. सर्व शाळांमधील १३ फेब्रुवारी २०१३नंतर टीईटी उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची शिक्षक म्हणून नियुक्ती झाली. जिल्हा परिषदेच्या १७ तर खासगी १५ अशा ३२ शिक्षकांच्या टीईटीच्या मूळ प्रमाणपत्राची पडताळणी शिक्षण विभागाकडून सुरू आहे. शिक्षकांच्या सर्व तपशिलासह टीईटी प्रमाणपत्राची मूळ प्रत प्राथमिक विभागाच्या शिक्षणाधिकाऱ्यांनी मागवली आहे.

पुण्याला ३२ प्रमाणपत्र पडताळणीसाठी जाणार:

  • शिक्षकांकडून मिळालेली कागदपत्रे अचूक असल्याची पडताळणी गटशिक्षणाधिकाऱ्यांना करायची आहे. भविष्यात यासंबंधी काही प्रकरण उद्भवल्यास जबाबदारी निश्चितीही शिक्षण विभागाने केली. जिल्हा परिषदेंतर्गत १७ तर खासगी शाळांतील ७ व माध्यमिक शिक्षण विभागातील ८ अशा ३२ शिक्षकांची प्रमाणपत्रे पडताळणीसाठी पुण्याला पाठविली जाणार आहेत. शिक्षकांवर कारवाई:
  • या सर्व शिक्षकांच्या प्रमाणपत्रांची बारकाईने पडताळणी केली जाईल. काही आक्षेपार्ह आढळल्यास ती माहिती राज्य परीक्षा परिषदेला दिली जाईल. त्यानंतर शिक्षकांवर कारवाई केली जाईल. जे शिक्षक टीईटी मूळ प्रमाणपत्र सादर करणार नाहीत, त्यांचे गेल्या महिन्याचे वेतन देण्यात येणार नसल्याचेही शिक्षण विभागाने मुख्याध्यापक, गटशिक्षणाधिकाऱ्यांना कळविले आहे. यामुळे काही गुरुजींची झोप उडाली आहे.
Share