अंभोरा येथील घटना; सोशल मीडियावर व्हीडिओ व्हायरल
रावणवाडी (गोंदिया): एका महिलेची छेडखानी करणाऱ्या महाराजाची (ढोंगीबाबाची पिटाई) जमावाने चांगलीच पिटाई केली. तर महिलेनेही चपलेने चांगलेच बदडले. ही घटना गोंदिया तालुक्यातील अंभोरा येथे गुरुवारी (ता. ६) दुपारी तीनच्या सुमारास घडली. या घटनेचा समाजमाध्यमातून व्हीडिओ देखील चांगलाच व्हायरल झाला आहे.
तालुक्यातील अर्जुनी येथील एक ढोंगीबाबा गेल्या सात वर्षांपासून पीडित महिलेच्या शेजारी असलेल्या एका घरी पूजापाठ करण्याकरिता येत होता. त्यामुळे हळूहळू त्याची ओळख पीडित महिलेसोबत झाली. या महिलेचा मुलगा चिडचिड्या स्वभावाचा असल्याने तिनेही या महाराजाकडून पूजापाठ करण्याचा बेत आखला.
गुरुवारी ठरल्याप्रमाणे महाराजाला पीडित महिलेने आपल्या पूजेकरिता बोलाविले होते. दुपारी तीननंतर पूजापाठ सुरू असताना या महाराजाने महिलेसोबत छेडखानी करीत अभद्र व्यवहार केला. हा प्रकार तिच्या पतीच्या लक्षात येताच त्याने महाराजाला घराबाहेर काढले. हळूहळू ही वार्ता गावात पसरली. गावकऱ्यांनी घटनास्थळी गोळा होत महाराजाची चांगलीत धुलाई केली.
पीडित महिलेनेदेखील महाराजाला चपलेचा मार दिला.महाराजाने पाया पडून महिलेची माफी मागावी, अशी मागणी करतानाच जमाव महाराजाची धुलाईदेखील करीत होता. याचा व्हीडिओ अंभोरा, अर्जुनी परिसरातच नव्हे, तर संपूर्ण जिल्ह्यात चांगलाच व्हायरल झाला. नानाविध चर्चेला उधाण आले. दरम्यान, हे प्रकरण रावणवाडी पोलीस ठाण्यात पोहोचल्यानंतर समझोत्याअंती प्रकरण मिटविण्यात आले. (ढोंगीबाबाची पिटाई)
या प्रकरणाची माहिती मिळताच आम्ही पोलीस कर्मचारी घटनास्थळी धाव घेतली. नेमके काय घडले, याची शहानिशा केली. दोन्ही पक्षांना पोलीस ठाण्यात बोलावून घेतले. यावेळी दोन्ही पक्षांनी पोलीस ठाण्याच्या फाटकासमोर आपसांत समझोता केला. पीडित महिलेने तक्रार दाखल करणार नसल्याचे सांगितल्याने तक्रार नोंदवून घेतली नाही.
– श्री. सरोदे,
सहायक पोलीस निरीक्षक, रावणवाडी.








