आतापर्यंत 2 आमदारांना जेलची हवा खायला लावणारा मतदारसंघ.!

भंडारा : 31 डिसेंबरपासून भंडारा जिल्ह्यातील तुमसर-मोहाडी विधानसभा मतदारसंघ चर्चेत आला आहे. आमदार राजू कारेमोरे यांनी मोहाडी पोलिसांना शिवीगाळ केली होती आणि त्यांना काल अटक करण्यात आली होती. त्यानंतर जिल्ह्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले. यापूर्वी 21 सप्टेंबर 2019लासुद्धा तत्कालीन आमदार भाजपचे चरण वाघमारे यांना अशाच प्रकरणात अटक झाली होती. त्यामुळे हा आमदारांना जेलची हवा खायला लावणारा मतदारसंघ आहे का, या चर्चेने जिल्ह्यात जोर पकडला आहे.

2019 मध्ये भाजप आमदार चरण वाघमारे यांच्यानंतर आता राष्ट्रवादीचे आमदार राजू कारेमोरे यांचा नंबर लागला आहे. भंडारा जिल्ह्यातील तुमसर विधानसभा क्षेत्र नेहमीच देशात चर्चेचा विषय राहीला आहे.

या मतदारसंघात आमदार व पोलीस यांच्यांत नेहमीच खटके उडाले आहेत. पहिला प्रसंग 21 सप्टेंबर 2019 मध्ये मोहाडी तुमसर विधानसभा क्षेत्राचे तत्कालीन भाजप आमदार चरण वाघमारे यांच्या सोबत घडला. तुमसर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये पेटी वाटप कार्यक्रमात बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांसोबत अनिल जिभकाटे या भाजप कार्यकर्त्याचा वाद झाला होता.

आपल्या कार्यकर्त्यांची बाजू घेण्यासाठी तत्कालीन आमदार चरण वाघमारे हे पोलिस ठाण्यात गेले होते. तेव्हा त्यांच्यावर महिला पोलिस उपनिरीक्षक यांचा विनयभंग करणे व शासकीय कामात अडथळा आणणे आदी गुन्हे दाखल करून अटक करण्यात आली होती. त्यांना एक दिवस तुरुंगात रहावे लागले होते. विशेष म्हणजे भाजपने यावेळी त्यांना तिकीट नाकारली. त्या घटनेनंतर आता पुन्हा 31 डिसेंबर 2021 रोजी तुमसर-मोहाडी विधानसभा क्षेत्राचे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे विद्यमान आमदार राजू कारेमोरे आपल्या व्यापारी मित्रांना झालेल्या मारहाणीचा जाब विचारण्यासाठी मोहाडी पोलीस स्टेशनमध्ये गेले असताना त्यांचा पोलिसांशी वाद झाला आणि त्यांनी पोलिसांना शिवीगाळ केली, तसा व्हिडिओसुद्धा व्हायरल झाला. या प्रकरणी 3 जानेवारीला पोलिसांनी आमदार कारेमोरेंना अटक केली होती. न्यायालयाच्या आदेशानंतर त्यांना तुरुंगात जावे लागले. उल्लेखनीय म्हणजे चरण वाघमारेंवर जे गुन्हे दाखल झाले होते, तेच गुन्हे आमदार कारेमोरेंवरसुद्धा दाखल करण्यात आले आहेत.

दोन्ही प्रकरणांत घटनास्थळ तुमसर-मोहाडी विधानसभा मतदारसंघ असून दोन्ही आमदारांच्या कार्यकर्त्यांचा पोलिसांसोबत झालेला वाद, हेच कारण आहे. त्यामुळे तुमसर-मोहाडी विधानसभा मतदारसंघ व आमदारांना अटक हे समीकरण आहे की योगायोग हाच आता चर्चेचा विषय बनला आहे. भाजपचे तत्कालीन आमदार चरण वाघमारे व आता राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार चरण वाघमारे यांच्यासोबत सारखाच प्रसंग घडला आहे. राजकीय नेते व पोलीस यांच्यातील वाद काही नवीन राहिला नसून तुमसर मोहाडी विधानसभा क्षेत्रात नेहमी पोलिस आणि लोक प्रतिनिधी यांचे खटके उडत असतात. पण आता मात्र हा चर्चेचा विषय ठरला आहे.

Print Friendly, PDF & Email
Share