विशेष ‘कोविड लसीकरण मोहिम’ जनजागृतीसाठी जिल्ह्यातील प्रशासकीय अधिकारी गावोगावी

जिल्हाधिकारी व CEO यांनी दिल्या देवरी व सालेकसा तालुक्यातील लसीकरण न करणाऱ्या लाभार्थ्यांना भेटी…

गोंदिया: मार्च 2020 पासून जिल्ह्यात कोविड आजाराचा संसर्ग सुरु असल्याने जिल्हाधिकारी नयना गुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली नियोजनबध्द प्रतिबंधात्मक कार्यवाही सुरु आहे. जिल्हा प्रशासन, जिल्हा आरोग्य विभाग व इतर विभागाच्या एकत्रित सहभागाने संपूर्ण ताकदनिशी कोरोना विरुध्द जिल्ह्यात आपण लढत आहोत. जिल्ह्याने त्यावर काटोकाट प्रयत्नांची कास धरुन नियंत्रण मिळविण्यात यशही मिळविले आहे व त्याचाच एक भाग म्हणून कोरोना आजाराचे रुग्णांची संख्या कमी झाल्याचे चित्र जिल्ह्यात दिसत आहे.

कोरोना संसर्ग कमी करण्यासाठी कोरोना लसीकरण हे प्रभावी माध्यम असल्याने जिल्ह्यात जिल्हाधिकारी नयना गुंडे व जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली नियोजनबध्द कोविड लसीकरण मोहिम सुरु आहे. जिल्ह्यातील सर्व विभागाचे अधिकारी, आशा सेविका, आरोग्य कर्मचारी गावोगावी जनजागृती करुन कोविड लसीकरण सर्व लाभार्थ्यांनी घेतले पाहिजे यासाठी जीव पणाला लावून प्रयत्न करीत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून जिल्ह्यातील प्रथम डोजचे प्रमाण 90.85 टक्के व दुसऱ्या डोजचे प्रमाण 64.27 टक्के आहे.

सद्यस्थितीत कोविड आजाराच्या तिसऱ्या लाटेचा इशारा व नव्याने शिरकाव होऊ घातलेल्या ओमायक्रॉन व्हेरीयंटला रोखण्यासाठी कोविड लसीकरणाचे दोन्ही डोज विहित अंतराने घेणे आवश्यक आहे, जेणेकरुन कोविड आजाराला प्रतिबंध करण्यासाठी प्रतिकारशक्ती शरिरात निर्माण होते. अजुनही जिल्ह्यात 10 टक्के लोकांनी पहिला डोज सुध्दा घेतलेला नाही ही गंभीर बाब आहे. अजुनही काही लोकांमध्ये कोविड लसीकरणाविषयी भीती व गैरसमज असल्यामुळे नागरिक कोविड लसीकरण घेणे टाळत आहेत. अशा सर्व बाजू बघता जिल्हा प्रशासनाद्वारे 27 डिसेंबर 2021 ते 1 जानेवारी 2022 दरम्यान विशेष लसीकरण मोहिम राबविण्यात येत आहे.

सदर मोहिमेत जनजागृतीवर भर देण्यात येत असून स्वत: जिल्हाधिकारी, जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्ह्यातील उपविभागीय अधिकारी, सर्व तालुका अधिकारी, तहसिलदार, खंड विकास अधिकारी हे सर्व आपले नियमीत कामे बाजूला ठेवून गावोगावी भेटी देऊन लोकांच्या मनातील कोविड लसीकरणाबाबत भीती, गैरसमज दूर करुन जनजागृती करीत आहेत. त्यासोबतच आरोग्य विभागातील आरोग्य सेविका, आशा सेविका, आरोग्य कर्मचारी यांचे पथक, हर घर दस्तक कार्यक्रमांतर्गत लसीकरणापासून वंचित राहिलेल्या लोकांना घरोघरी गृहभेटी देऊन लसीकरण करीत आहेत. गेल्या दोन दिवसापासून लसीकरण मोबाईल पथकाने आजारी असलेले व्यक्ती तसेच दिव्यांग व्यक्तींना त्यांच्या घरी जाऊन लसीकरण केले आहे. तसेच नकार असलेले व विरोध करणाऱ्या लोकांचे मतपरिवर्तन करुन लसीकरण केलेले आहे.

29 डिसेंबर 2021 रोजी जिल्हाधिकारी नयना गुंडे व जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल पाटील यांनी देवरी तालुक्यातील मरामजोग, फुटाणा, सावली, डोंगरगाव व मुल्ला येथे तसेच सालेकसा तालुक्यातील सातगाव येथील भेटी दरम्यान सावली या गावाला भेट देऊन पोलीस पाटील व ग्रामपंचायत सदस्य यांना भेटून गावातील कोविड लसीकरणाबाबत नकार देत असलेल्या लाभार्थ्यांना भेटून त्यांचे मतपरिवर्तन करण्यात यश मिळविले व लगेच मोबाईल पथकाने लसीकरण केले.

यावेळी भेटी दरम्यान जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.नितीन कापसे, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.दिनेश सुतार, उपविभागीय अधिकारी अनमोल सागर, तहसिलदार अनिल पवार, खंडविकास अधिकारी चंद्रमणी मोडक, देवरी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी श्री पाटणकर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.ललित कुकडे व वैद्यकीय अधिकारी डॉ.सुनिल येळणे उपस्थित होते.

Share