गोंदिया: जिल्हा परिषदेसाठी ६९.६९ टक्के मतदान, देवरीत मतदान केंद्राबाहेर सापडल्या दारूच्या बाटल्या

◾️देवरी तालुक्यातील पोलिंग पार्टी ने उपाशी राहूनच बजावले कर्तव्य , अनेक शिक्षकांचा मनस्ताप

◾️देवरीत मतदान केंद्राबाहेर मतदान वेळेतच दारूच्या बाटल्या, प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्न चिन्ह ?

गोंदिया 22-: गोंदिया जिल्हा परिषदेच्या ४३, पंचायत समितीच्या ८६ आणि नगरपंचायतच्या ४५ जागांसाठी मतदान घेण्यात आले.यात जिल्हा परिषदेसाठी ६९.६९ टक्के मतदान झाले आहे.निवडणुक विभाग प्रसारमाध्यमांना मतदानाच्या दिवशी रात्री उशीरापर्यंत 3 वाजेपर्यंत झालेल्या मतदानाचेही आकडेवारी देऊ शकले नाही, यावरुन प्रशासनाची संथगती आणि नियोजन व्यवस्थित नसल्याचे पुन्हा उघडकीस आले.जेव्हा की लोकसभा विधानसभा निवडणुकीदरम्यान 5 वाजेपर्यंतची टक्केवारी रात्रीपर्यंत अंदाजे मिळायची.

43 जिल्हा परिषद विभाग व 86 पंचायत समिती गणासाठी गोंदिया जिल्ह्यात मंगळवार 21 डिसेंबर रोजी 1375 मतदान केंद्रावर मतदान झाले असून या निवडणुकीत 69.69 टक्के मतदान झाले. एकूण 8 लाख 38 हजार 977 मतदारांपैकी 5 लाख 84 हजार 693 मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला. जिल्हा परिषदसाठी 243 व पंचायत समितीसाठी 388 उमेदवारांचे भाग्य मतपेटीत बंद झाले आहे.

अर्जुनी मोरगाव, सडक अर्जुनी व देवरी या तालुक्यात मतदानाची वेळ सकाळी 7.30 दुपारी 3.00 वाजेपर्यंत होती तर गोंदिया, तिरोडा, गोरेगाव, सालेकसा व आमगाव तालुक्यात सकाळी 7.30 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत मतदानाची वेळ होती. मतदारांनी उत्स्फूर्तपणे आपल्या मतदानाचा हक्क बजावला. सर्व ठिकाणी शांततेत व सुरळीतपणे मतदान प्रक्रिया पार पडली. परंतु देवरी येथील चिचगड रोड वरील रहदारीच्या मार्गावरच जि प हायस्कुल च्या मतदान केंद्रा पासून 200 मीटर च्या आतच दारूच्या ताज्या बाटल्या मतदान सुरु असतांना पडलेल्या असल्याचे दिसून आले यामुळे प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्न चिन्ह निर्माण झालेला आहे.

मतदानाची तालुकानिहाय टक्केवारी:

गोंदिया 70.40 टक्के, तिरोडा 65.61, गोरेगाव 69.96, सडक अर्जुनी 69.10, अर्जुनी मोरगाव 71.80, देवरी 70.10, आमगाव 70.38 व सालेकसा 70.53 टक्के मतदान झाले. सर्वाधिक 71.80 टक्के मतदान अर्जुनी मोरगाव तालुक्यात झाले तर सर्वात कमी मतदान 65.61 टक्के तिरोडा तालुक्यात झाले. या निवडणुकीत 4 लाख 19 हजार 190 महिला मतदारांपैकी 2 लाख 92 हजार 237 महिला मतदारांनी तर 4 लाख 19 हजार 785 पुरुष मतदारांपैकी 2 लाख 92 हजार 456 पुरुष मतदारांनी मतदान केले.

ज्या शाळांना मतदान केंद्र ठेवण्यात आले होते,त्या शाळामध्ये मतदान साहित्य घेऊन पोचल्यावर स्वतः मतदान अधिकारी व इतरांनाच शाळेच्या खुर्च्या व इतर साहित्य ठेवण्यासाठीचा जागा स्वच्छ करावे लागल्याचेही समोर येऊ लागले आहे.त्यातच थंडीचा प्रभाव अधिक असतानाही नियोजन निवडणूक विभागाने केले नाही. गोरेगाव येथे तर ईव्हीएमयंत्र घेऊन आलेले अधिकारी मुख्य रस्त्यावरच बसमधून उतरत अर्धा किलोमीटर चालत आयटीआयमध्ये जात असल्याचे चित्र होते. देवरी येथील मतदान अधिकाऱ्यांची गैरसोय झाल्याचे मनस्ताप दिसून आले. चहा , नास्ता जेवणाची गैरसोय झाल्याने उपाशी राहून कर्तव्य बजावले.

Share