टीईटी परीक्षा घोटाळा प्रकरणातील आरोपी तुकाराम सुपेच्या घरी सापडले कोट्यवधींचे घबाड
वृत्तसंस्था / पुणे : गेल्या काही दिवसांपासून राज्यात विविध परीक्षांच्या पेपर फुटीची प्रकरणे समोर आली आहेत. आरोग्य भरतीनंतर, म्हाडा आणि आता टीईटी पेपरफुटी प्रकरणाने राज्यातील वातावरण तापून निघाले आहे.
टीईटी पेपरफुटी प्रकरणी पोलिसांनी काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे यांना अटक केली आहे. पुणे पोलिसांच्या सायबर सेलने तुकाराम सुपे यांना गुरुवारी (16 डिसेंबर) चौकशीसाठी बोलावलं होतं. चौकशी नंतर तुकाराम सुपे यांना अटक करण्यात आली आहे. यावेळी पोलिसांनी सुपे यांच्या घरी टाकलेल्या धाडीत लाखोंचा मुद्देमाल आढळला होता.
यानंतर आता पोलिसांनी सुपे यांच्या घरी आणखी एक धाड टाकली आहे.यामध्ये पोलिसांच्या हाती मोठे घबाड लागले आहे. छापेमारीत आरोपी सुपे याच्या घरात पोलिसांना दोन कोटीहून अधिक रुपयांची रक्कम आणि लाखो रुपये किमतीचे सोन्याचे दागिने आढळले आहेत. सुपे यांच्या घरी छापा टाकायच्या आधी पत्नी आणि मेहुण्याने ही रक्कम दुसऱ्या ठिकाणी लपवली होती. पेपरफुटी प्रकरणात राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे यांना अटक पण पोलिसांनी दोघांना ताब्यात घेत कसून चौकशी केली असता, मोठे घबाड पोलिसांच्या हाती लागले आहे. आरोपी तुकाराम सुपे हा महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचा अध्यक्ष आहे. याआधी सुपे याच्या घरी पोलिसांना 88 लाख रुपयांचे सोने आणि काही रोकड मिळाली होती. या घटनेचा पुढील तपास पुणे पोलीस करत आहेत.
खरेतर, म्हाडा पेपर फुटी प्रकरणी तपास करत असताना, टीईटी अर्थातच शिक्षक पात्रता परीक्षेत गोंधळ असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. टीईटी भरती प्रक्रियेची जबाबदारी देखील जीए टेक्नॉलॉजीकडे देण्यात आली होती. शिक्षक पात्रता परीक्षा पास होण्यासाठी पैसे दिलेल्या परीक्षार्थींना ओएमआर शीट अर्थातच उत्तर पत्रिका रिकामी ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. पेपर तपासणी करत असताना विद्यार्थ्यांची उत्तरपत्रिका भरली जात होती आणि उत्तीर्ण केले जात होते. यातूनही काही परीक्षार्थी नापास झाले, तर अशा विद्यार्थ्यांना पुर्नमूल्यांकनासाठी अर्ज करण्यास सांगितला जायचा. यानंतर नापास झालेल्या विद्यार्थ्यांना देखील उत्तीर्ण केलं जायचं. यासाठी परीक्षार्थीकडून प्रत्येकी 35 हजार ते एक लाख रुपये घेतले जात असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.