TET परीक्षा घोटाळा: तुकाराम सुपेंच्या घरी दुसऱ्या धाडीतही 2 कोटींहून अधिक रक्कम जप्त

पुणे – पुणे पोलिसांकडून टीईटी परीक्षा पेपरफुटी प्रकरणात मोठी माहिती मिळाली आहे. महाराष्ट्र परीक्षा मंडळाचे अध्यक्ष तुकाराम सुपे यांच्या घरी टाकलेल्या पहिल्या धाडीत 88 लाख रुपयांची रोख रक्कम जप्त केल्यानंतर आता दुसऱ्या धाडीतही दोन कोटींहून अधिक रक्कम पोलिसांनी जप्त केली आहे. तुकाराम सुपे यांच्या घरी दुसऱ्या धाडीत आणखी पैशाचे घबाड सापडले आहे. सुपेंच्या घरातून पोलिसांना तपासात दोन कोटीहून अधिक रक्कम आणि सोने हस्तगत केले आहे. पोलीस सुपे यांच्या घरी धाड टाकायच्या आधीच पत्नी आणि मेहुण्याने रक्कम दुसरीकडे ठेवली होती. पण पोलिसांनी कसून तपास केल्यानंतर दोन कोटींहून अधिक रक्कम आणि सोने मिळाले.

याआधी महाराष्ट्र परीक्षा मंडळाचे अध्यक्ष तुकाराम सुपे यांच्या घरातून 17 डिसेंबर रोजी 88 लाख रुपयांची रोख रक्कम पुणे पोलिसांनी जप्त केली होती. महाराष्ट्र राज्य परीक्षा विभागाचे अध्यक्ष आणि महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषदेचा अतिरीक्त कार्यभार असलेले तुकाराम सुपे यांना पुणे पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. सुपेंसोबत शिक्षण आयुक्ताचा सल्लागार अभिषेक सावरीकर यालाही पोलिसांनी अटक केली आहे.

अनेक धक्कादायक गोष्टी म्हाडा पेपरफुटीप्रकरणी सुरू असलेल्या तपासात समोर येत असून इतर परीक्षांमधील घोटाळे बाहेर येत आहेत. शिक्षक पात्रता परीक्षेतही पैसे घेऊन अनेकांना उत्तीर्ण करण्यात आल्याचे समोर आले आहे.

दरम्यान पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी सांगितले होते की, दोन पेपरफुटीचे प्रकरणाचा तपास सुरू होता. म्हाडा पेपरफुटीचा तपास सुरू असताना टीईटीमध्ये गोंधळ असल्याचे दिसून आले. या प्रकरणी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला असून दोघांना अटक केली. यामध्ये सुपे आणि सावरीकरचा समावेश आहे.

Share