गोंदिया-भंडारा जिल्ह्याच्या विकासाला निधीची कमी भासू देणार नाही- ना. एकनाथ शिंदे

◾️देवरी न.पं. वाढीव कर कमी करण्याची कार्यवाहीचे आश्वासन

देवरी 16-शिवसेना हा पक्ष म्हणजेच विकास. विरोधकांप्रमाणे पोकळ आश्वासने देऊन लोकांना भ्रमित करणे हे आमच्या रक्तात नाही. भाजपकडे शिवसेनेसह महाविकास आघाडीला बदनाम करण्याशिवाय दुसरा अजेंडाच नाही. मागील युतीच्या शासन काळात मा. बाळासाहेबांनीच ओबीसींसाठी मंत्रालयाची मागणी केली होती, हा इतिहास आहे. आज मात्र भाजपमधील काडीबाज मंडळी ओबीसी समाजाला मूर्ख बनविण्याचे काम करीत असून बनावट आंदोलने करून निवडणुकीत मतदानावर बहिस्काराची भाषा बोलत आहेत. या भाजपच्या दुपट्टी धोरणापासून गोंदिया-भंडारा जिल्ह्याच्या विकासासाठी शिवसेना मतदान करा, विकासनिधी कमी पडू देणार नाही, असे आवाहन राज्याचे नगरविकास आणि सार्वजिनिक बांधकाम मंत्री ना. एकनाथ शिंदे यांनी देवरी येथे केले.

देवरी येथे आयोजित निवडणुक प्रचार सभेत बोलत होते. यावेळी मंचावर गोंदिया जिल्हा संपर्क प्रमुख निलेश धुमाळ, जिल्हा सहसंपर्कप्रमुख मुकेश शिवहरे, बाळा परब, जिल्हा प्रमुख सुरेंद्र नायडू, पंकज यादव आदी मान्यवर उपस्थित होते.

ना. शिंदे हे देवरी नगरपंचायत तथा गोंदिया जिप.पंस निवडणुक प्रचार दौऱ्यावर देवरी येथे आले होते. यावेळी ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावर बोलताना म्हणाले की मागील भाजप-सेना युतीच्या सरकारचे वेळी मा. बाळासाहेब ठाकरे यांनी ओबीसी मंत्रालयाची मागणी केली होती. आम्ही ओबीसी आरक्षण देण्याच्या बाजूने आहोत. मात्र राज्यातील भाजपनेते आणि केंद्रातील भाजप हे ओबीसी आरक्षणाचे विरोधक असून ते ओबीसी समाजाची दिशाभूल करीत आहेत. अशा लोकांपासून ओबीसींनी सावध राहिले पाहिजे. देवरी येथील भाजप नेत्यांनी प्रशासनाला हाताशी धरून देवरीकरांवर करांचा प्रचंड बोजा वाढविल्याच्या तक्रारी आहेत. नगरपंचायतीमध्ये शासनात असून सुद्धा भाजप देवरीकरांना शुद्ध आणि मुबलक पेयजल पुरवू शकली नाही, अंतर्गत रस्त्यांची दूरवस्था आहे. टपऱ्यांसह फुटबाथ विक्रेत्यांसाठी सोय नाही, शाळा नसताना शिक्षणकराचा बोजा लादला, अतिक्रमण धारकांना अद्याप पट्टे दिले नाही. म्हणून भाजपला धडा शिकविण्यासाठी आपल्या हक्काची माणसे निवडून द्या, आपल्याला निधीची कमी भासू देणार नाही, असे ही ना. शिंदे यावेळी बोलताना म्हणाले.तत्पूर्वी आदिवासींचे पारंपारिक नृत्य सादर करून ना. शिंदे यांचे स्वागत करण्यात आले.यावेळी परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Share