TET: पेपरफुटी प्रकरणात महाराष्ट्र राज्य परीक्षा विभागाचे अध्यक्ष तुकाराम सुपे यांना अटक
टीईटी परीक्षांमध्ये गैरप्रकार केल्याप्रकरणी तुकाराम सुपे यांना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाच्या (म्हाडा) परीक्षेतील गैरप्रकार उघड झाल्यानंतर सर्व परीक्षा रद्द कराव्या लागल्या होत्या. याप्रकरणी पोलिसांकडून कंत्राटदार कंपनीच्या संचालकासह सहा जणांना अटक करण्यात आली होती. भरती परीक्षेच्या कामाचे कंत्राट मिळालेल्या ‘जी. ए. सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजीस’ या कंपनीनेच पेपरफुटीचा प्रयत्न केल्याचं उघड झालं होतं. अटक करण्यात आलेल्यांमध्ये कंपनीचा संचालक डॉ. प्रीतिश देशमुख याचाही समावेश होता.
पोलिसांनी प्रीतिश देशमुखच्या घराची झाडाझडती घेतली असता टीईटीची ओळखपत्रं सापडली होती. तसंच काही अपात्र विद्यार्थ्यांची हॉल तिकिटे मिळाली होती. त्यामुळे टीईटी परीक्षेतही गैरकारभार झाल्याची शंका उपस्थित झाली आणि त्यानुसार तपास सुरु झाला. यानंतर पुणे पोलिसांनी तुकाराम सुपे यांना चौकशीसाठी बोलावलं होतं. या चौकशीनंतर तुकाराम सुपे यांना अटक करण्यात आली आहे. या कारवाईनंतर खळबळ उडाली असून तपासाचे धागेदोरे अजून कुठपर्यंत जातात हे पहावं लागेल.
कंत्राटदार कंपनीच पेपरफुटीचा प्रयत्न करीत असल्याची माहिती म्हाडा आणि ‘एमपीएससी’ची तांत्रिक समिती यांना मिळताच शनिवारी म्हाडा पुणे मंडळाने याप्रकरणी सायबर पोलिसांत तक्रार दाखल केली. कंपनीचा संचालक प्रीतिश याला भेटण्यासाठी दलाल येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी शनिवारी रात्री दहा वाजता विश्रांतवाडी येथून प्रीतिश आणि दोन दलालांना अटक केली. रविवारी औरंगाबादमधून आणखी दोन दलालांना अटक करण्यात आली. मुंबई, पुणे आणि औरंगाबादमध्ये पोलीस चौकशी करीत आहेत.
गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. परीक्षेसाठी परीक्षार्थींकडून पैसे घेतले जात असल्याच्या तक्रारी आव्हाड यांच्याकडे आल्या होत्या. काही परीक्षार्थींनी आईचे मंगळसूत्र, शेतजमीन गहाण ठेवून दलालांना पैसे दिल्याच्याही तक्रारी आहेत. परीक्षार्थींची आर्थिक फसवणूक झाल्याची, परीक्षेत घोटाळा झाल्याचे उघड झाल्यानंतर आव्हाड यांनी, या प्रकरणातील दोषींवर कारवाई केली जाईल, अशी माहिती समाजमाध्यमाद्वारे शुक्रवारी दिली होती. त्यानुसार आव्हाड आणि म्हाडाच्या अधिकाऱ्यांनी चौकशी केली असता यात घोटाळा असल्याचे उघड झाले. त्यानुसार सायबर पोलिसांनी तात्काळ कारवाई केली आणि पेपरफुटीचा प्रयत्न शनिवारी हाणून पाडला.
म्हाडातील विविध पदांच्या ५६५ रिक्त जागा भरण्याची प्रक्रिया काही महिन्यांपासून सुरू आहे. या भरती परीक्षेसाठी म्हाडाने जी. ए. सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजीस कंपनीची निवड केली होती. त्यानुसार रविवारी १२ डिसेंबर, १५ डिसेंबर, १९ डिसेंबर आणि २० डिसेंबरला म्हाडाच्या सर्व विभागीय मंडळांतील विविध केंद्रांवर ही परीक्षा घेण्यात येणार होती. १४ पदांच्या ५६५ जागांसाठी जवळपास पावणेतीन लाख अर्ज आले होते. मात्र परीक्षेसाठी दोन-तीन दिवस असताना परीक्षार्थींकडून पैसे घेतले जात असल्याच्या तक्रारी करण्यात आल्या होत्या.