“4500 द्या गोंदिया जिल्ह्यातून दारू तस्करी करा” लाच घेणारा सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक एसीबीच्या जाळ्यात
प्रतिनिधी / गडचिरोली : गोंदिया जिल्ह्यातून दारू तस्करी करून देसाईगंज तालुक्यातील किरकोळ विक्रेत्यांना दारू विक्रीसाठी परवानगी देण्यासाठी साडेचार हजारांची लाच घेणे देसाईगंज पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकास महागात पडले आहे. गडचिरोली येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने या सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकावर कारवाई केली आहे.
प्रेमचंद जितलाल मच्छिरके ५३ पोलीस स्टेशन देसाईगंज असे लाचखारे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकाचे नाव आहे. तक्रारदार हा देसाईगंज येथीलच रहिवासी असून तो गोंदिया जिल्ह्यातून दारू तस्करी करतो. तसेच तस्करी केलेल्या दारूची विक्री तालुक्यातील विविध गावांमध्ये करतो. यासाठी सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक मच्छीरके याने ५ हजारांची लाच मागीतली होती. याबाबत दारू तस्कराने गडचिरोली लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली होती. यावरून लाप्रवि गडचिरोली ने सापळा रचून कारवाई तडजोडीअंती साडेचार हजारांची लाच स्वीकारताना पोलीस ठाण्यातच रंगेहात अटक केली आहे.
सदर कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक राकेश ओला, अपर पोलीस अधीक्षक मिलींद तोतरे, अपर पोलीस अधीक्षक मधुकर गिते यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपअधीक्षक सुरेंद्र गरड, पोलिस हवालदार प्रमोद ढोरे, नत्थु धोटे, पोना किशोर जोंजारकर, श्रीनिवास संगोजी, पोलिस शिपाई किशोर ठाकुर, चालक शिपाई तुळशिराम नवघरे यांनी केली आहे.