आमदारांना गाडी घेण्यासाठी सरकारकडून ३० लाख!

मुंबई: विधानसभेत सन २०२०-२१ च्या अर्थसंकल्पावर सर्वसाधारण चर्चा झाली. अर्थसंकल्पातील विविध मुद्द्यांवर सन्माननीय सदस्यांकडून तारांकित प्रश्नांच्या तासाला प्रश्न उपस्थित केले. यावर राज्याचे उपमुख्यमंत्री आणि वित्तमंत्री अजित पवार यांनी उपस्थित प्रश्नांची उत्तरे दिले.

आमदारांना गाडी घेण्यासाठी सरकारकडून १० लाखाची रक्कम दिली जाते. त्यात वाढ करून ३० लाखांवर नेण्याचा निर्णय सरकारने घेतला असल्याचे अजित पवारांनी आज स्पष्ट केले.

कोरोना व्हायरस संदर्भात अजित पवार म्हणाले, आज जगभरात फोफावलेल्या कोरोना व्हायरसमुळे इराणमध्ये ३ खासदार मृत्यूमुखी पडले आहेत. याच पार्श्वभूमीवर शनिवारी अधिवेशन संपणार आहे. त्यामुळे सर्व सन्माननीय सदस्यांनी आपल्या मतदारसंघात गेल्यावर काळजी घ्या. हा आजार वाढत गेला तर गंभीर परिस्थिती निर्माण होईल. पण या कठीण परिस्थितीत महाराष्ट्र विकास आघाडी सरकारकडून एक रुपयाही कमी पडू देणार नाही याची काळजी सरकारने घेतली आहे, असा विश्वास अजित पवार यांनी सभागृहात व्यक्त केला.

आमदारांची चांदी

अर्थसंकल्प मांडताना आमदार विकास निधी दोन कोटींवरून तीन कोटींवर नेत सर्वपक्षीय आमदारांना खूश करणाऱ्या अर्थमंत्र्यानी आज आमदारांना आलिशान गाडय़ा घेण्यासाठी बिनव्याजी ३० लाख रुपये कर्ज देण्याची घोषणा केली. आमदारांना पाच वर्षांत याची प्रतिपूर्ती करावी लागेल. तसेच डोंगरी भागाच्या विकासासाठी ५० लाखांवरून एक कोटी निधी, तर तालुक्यासाठी दोन कोटी असे एका आमदाराला पाच कोटी रुपयांचा विकास निधी देण्याची घोषणाही पवार यांनी केली. माजी सैनिक व विधवा पत्नी यांची संख्या दोन लाख ४४ हजार असून, त्यांचे घरभाडे माफ करण्यात येणार आहे.

Share