आता किराणा दुकानामधूनही मिळणार वाईन..?

Mumbai: सरकारने काही दिवसांपूर्वीच विदेशातून मागविण्यात येणाऱ्या दारुवरील उत्पादन शुल्क निम्म्याने कमी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार हा शुल्क 300 टक्क्यांवरून 150 टक्के करण्यात आले. त्यामुळे विदेशी दारुच्या किंमतीही मोठ्या प्रमाणात कमी झाल्या.

तळीरामांसाठी ठाकरे सरकारने पुन्हा एकदा ‘गुड न्यूज’ आणलीय.. दारुचे गुत्ते शोधण्यात तळीरामांचा ‘मोलाचा’ वेळ वाया जात होता.. ही ‘अडचण’ लक्षात घेऊन ठाकरे सरकारने आता किराणा दुकानांमधूनच वाईन विकण्यास परवानगी देण्याचा निर्णय घेतला आहे..

गहू, तांदुळ किंवा इतर वस्तू घेण्यासाठी किराणा दुकानात गेलात नि तेथे तुम्हाला ‘वाईन’ची बाटली दिसली, तर उगाच दुकानदारावर संशय घेऊ नका..! या बाटल्या तेथे विकण्यासाठीही ठेवलेल्या असू शकतात. ठाकरे सरकार लवकरच याबाबतचा अध्यादेश काढणार आहे.

कोरोनामुळे राज्य सरकारच्या तिजाेरीत खडखडाट झालाय. त्यामुळे उत्पादन वाढविण्यासाठी सरकारने हा निर्णय घेतलाय. दुकानातून वाईन विकायची झाल्यास, १ लिटरमागे १० रुपये अबकारी कर आकारणार आहे. त्यामुळे किराणा दुकानातून वाईन घ्यायची झाल्यास खिशाही चांगलाच गरम ठेवायला  लागणार आहे..

तिजोरीत 5 कोटींची भर पडणार
द्राक्ष उत्पादकांना प्रोत्साहन देण्यासाठी सरकारने २००० पासून वाईनवरील कर वाढवला नव्हता. मात्र, आता सरकारने आज (मंगळवारी) वाईनवरील ‘अबकारी कर’ (नॉमिनल एक्साईज ड्युटी) 10 टक्के वाढविण्याचा निर्णय घेतलाय. त्यामुळे सरकारच्या तिजोरीत 5 कोटी रुपयांचा निधी वाढणार आहे.

शिवाय किराणा दुकान, बेकरीतून वाईनची विक्री केल्यावर राज्यात तिचा किती खप होतो, याची माहिती मिळणार असल्याचे मुख्य उत्पादन शुल्क विभागाचे सचिव वल्सा नायर सिंग यांनी सांगितले.

१ कोटी लिटरवर विक्री नेणार
दरवर्षी राज्यात ७० लाख लिटर वाईनची विक्री होते. ही विक्री १ कोटी लिटरवर नेण्याचा सरकारचा प्रयत्न आहे.. सीलबंद बॉटलमधूनच बारमध्ये वाईन विकता येणार आहे. दोन बारमधील अंतराचा २०० मीटरचा नियमही आता लागू नसेल.. बारमध्ये बीअरसारखेच कॅनमधून वाईन देता येणार आहे.

वाईनमध्ये ‘अल्कोहोल’चे प्रमाण दारुच्या तुलनेने कमी असते. शिवाय बेकरी, हॉटेलमध्ये काही पदार्थ बनविण्यासाठी वाईनचा वापर करण्यात येतो. त्यामुळे किराणा दुकानातून वाईन विक्री करण्यासाठी सरकार लवकरच परवानगी देणार असल्याचे सांगण्यात आले.

Print Friendly, PDF & Email
Share