भारतात ओमिक्रॉनचा शिरकाव : दोन रुग्णाची नोंद
कर्नाटक : कोरोनाचा नवा व्हेरिएंट ओमिक्रॉनने जगभरात भीतीचे वातावरण आहे. त्यातच आता भारतातही चिंता वाढली आहे. ओमायक्रॉनने देशात शिरकाव केला आहे. कर्नाटकमध्ये ओमायक्रॉनचे दोन रुग्ण आढळले असल्याने देशभरात चिंता व्यक्त केली जात आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने ही माहिती दिली आहे.
कर्नाटकात आलेल्या या दोन रुग्णांपैकी एक रुग्ण 11 तारखेला तर दुसरा रुग्ण 20 नोव्हेंबरला भारतात आले होते. त्यांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर आता ओमिक्रॉनची लागण झाल्याचेही समोर आले आहे. या दोन जणांपैकी एकाचे वय 66 आहे तर दुसऱ्याचे वय 46 आहे.
बुधवारी रात्री दोघांचे अहवाल आले, दोघांवर उपचार सुरू असून त्यांच्यावर देखरेख ठेवली जात आहे. या दोन्ही रुग्णांमध्ये सौम्य लक्षणे आढळून आली होती. सध्या घाबरण्याची गरज नसली तर खबरदारी घेणे महत्त्वाचे असल्याचे आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे.
ICMR डीजी बलराम भार्गव म्हणाले की, जीनोम सिक्वेन्सिंगद्वारे कर्नाटकमध्ये आतापर्यंत ओमिक्रॉनची दोन प्रकरणे आढळून आली आहेत. यासोबतच केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल यांनी सांगितले की, आतापर्यंत सुमारे 29 देशांमध्ये ओमायक्रॉन व्हेरिएंटची 373 प्रकरणे नोंदवण्यात आली आहेत.
दक्षिण आफ्रिका आणि युरोपमध्ये धुमाकूळ माजवणाऱ्या ओमिक्रॉन हा कोरोनाचा नवा विषाणू डेल्टापेक्षाही धोकादायक असल्याचा दावा तज्ज्ञांनी केला आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीनुसार, ओमिक्रॉनचे व्हेरियंटमध्ये आतापर्यंत अनेक म्युटेशन आढळले आहे.