कोरोनामुळे मृत पावलेल्या व्यक्तींच्या नातेवाईकास सानुग्रह अनुदान अर्ज करण्यासाठी संकेतस्थळ विकसित

Mumbai : कोविड-19 या आजाराने मृत पावलेल्या व्यक्तींच्या निकटच्या नातेवाईकास 50 हजार रुपये इतके सानुग्रह सहाय्य देण्याबाबत सर्वोच्च न्यायालयाने 4 ऑक्टोबर 2021 रोजी दिलेल्या निर्देशानुसार, महसूल व वन (आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन) विभागाने शासन निर्णय 26 नोव्हेंबर रोजी प्रसारीत केला आहे.
या शासन निर्णयाच्या अनुषंगाने शासनाने ऑनलाईन वेब पोर्टल विकसित केले असून, याद्वारे कोविड-19 या आजारामुळे मृत पावलेल्या व्यक्तींच्या निकट नातेवाईकास सानुग्रह सहाय्य प्राप्त करुन घेण्यासाठी कमीत कमी कागदपत्रांसह ऑनलाईन अर्ज दाखल करता येईल. यासाठी अर्जदाराने mahacovid19relief.in यावर लॉगिन करणे आवश्यक राहील. तसेच यासाठी https://epassmsdma.mahait.org/login.htm यावर देखील लिंक देण्यात आली आहे.
अर्जदारास, त्याच्या आधार क्रमांक, मृत व्यक्तीचा तपशील जसे मृत्यू प्रमाणपत्र आणि रुग्णालयाचा तपशील (पर्यायी) या कागदपत्रांच्या आधारे त्याचा स्वत:चा मोबाईल क्रमांक वापरुन सहाय्य मिळण्यासाठी लॉगिन करता येईल. केंद्र शासनाकडे ज्यांच्या कोविड-19 मुळे मृत्यूची नोंद झालेली आहे, अशा व्यक्तींच्या नातेवाईकाचा अर्ज इतर कोणत्याही कागदपत्रांची मागणी न करता मंजूर करण्यात येईल. इतर प्रकरणी, कोविड-19 मृत्यूचे कारण दर्शविणारे वैद्यकीय प्रमाणपत्र असेल तर अशी प्रकरणे देखील इतर कागदपत्रांची मागणी न करता मंजूर करण्यात येतील. अर्जदाराकडे मृत्यूचे कारण दर्शविणारे वैद्यकीय प्रमाणपत्र नसेल तर कोविड-19 मुळे मृत्यू झाल्याच्या पुष्ठर्थ कागदपत्रे अर्जदारास अर्जासोबत द्यावी लागतील.
जर एखादे प्रकरण नामंजूर झाल्यास त्यावर अर्जदारास शासन निर्णय क्र. सार्वजनिक आरोग्य विभाग, न्यायिक-2021/प्र.क्र.488/आरोग्य-05, दि. 13 ऑक्टोबर, 2021 अन्वये जिल्हास्तर, महानगरपालिका स्तरावर तक्रार निवारणासाठी गठीत करण्यात आलेल्या तक्रार निवारण अपिल करण्याचे व या समितीस अशा प्रकरणांची सुनावणी घेऊन अंतिम निर्णय देण्याचे अधिकार असतील. अर्ज अंतिमत: मंजूर करण्याचे अधिकार जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणास राहतील. सानुग्रह सहाय्यासाठी मंजूर करण्यात येणारे सर्व अर्ज 7 दिवसांकरीता वेबपोर्टलवर सार्वजनिक करण्यात येतील. जेणेकरुन मृत व्यक्तीच्या योग्य वारसास सहाय्य मिळावे, याकरीता त्याला अपील करण्याची संधी मिळू शकेल. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडून अंतिमत: मंजूर करण्यात आलेल्या अर्जानुसार, अर्जदाराच्या आधार संलग्नीय बँक खात्यामध्ये सानुग्रह सहाय्याची रक्कम थेटरित्या जमा करण्यात येणार आहे, असे कळविण्यात आले आहे.

Share