सरकारच ठरलं 1 डिसेंबरपासून शाळा; अशी आहे नियमावली

मुंबई: कोरोनाचा नवीन घातक ओमिक्रॉन व्हेरिएंट आढळल्यानंतर शाळा सुरू होणार की नाही असा संभ्रम निर्माण झाला होता. पण, अखेर राज्य सरकारने अध्यादेश काढून 1 डिसेंबरपासून शाळा सुरू करणारच असल्याचं स्पष्ट केले आहे. आज मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीनंतर शालेय शिक्षण विभागाकडून अध्यादेश काढण्यात आला आहे. पहिली ते चौथी ग्रामीण भागात तर पहिली ते सातवी शहरी भागात शाळा 1 डिसेंबरला सुरू होणार आहे. एका वर्गात 15 ते 20 विद्यार्थी असावे आणि एका बाकावर एकच विद्यार्थी असावा, अशी सूचना देण्यात आली आहे.

शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे शंभर टक्के लसीकरण बंधनकारक असणार आहे. विद्यार्थ्यांनी मास्क व्यवस्थित घातला आहे का याची काळजी शिक्षक आणि शाळांनी घ्यावी लागणार आहे. स्कूल बसचा वाहन चालक, मदतनीस यांचेही लसीकरण पूर्ण झालेले असणे बंधनकारक आहे. बसमध्ये विद्यार्थ्यांनी मास्क व्यवस्थित घातला आहे का याची काळजी बसमधील मदतनीसाने घ्यावी. सकाळ आणि दुपार अशा दोन सत्रात शाळा भरणार आहे. 3 ते 4 तासच शाळा भरणार आहे. पण मैदानी खेळ किंवा कोणतेही कार्यक्रम आयोजित करण्यास बंदी असणार आहे. विद्यार्थ्यांना शाळेत पाठवण्यासाठी पालकांची परवानगी आवश्यक असणार आहे. घरात कुणी आजारी असेल तर विद्यार्थ्याला घरीच थांबवावे लागणार आहे.जे विद्यार्थी शाळेत येऊ शकणार नाहीत त्यांच्यासाठी ऑनलाईन शिक्षण सुरू राहणार आहे. पहिले दोन आठवडे आनंददायी शिक्षणावर भर द्यावा लागणार आहे.

Share