पशुधन पर्यवेक्षकाला आठ हजारांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडले
गोंदिया : गोंदिया पंचायत समितीच्या पशुसंवर्धन विभागातील पशुधन पर्यवेक्षक संजय प्रेमलाल सव्वालाखे याला आठ हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले. ही कारवाई आज गुरुवार, 25 नोव्हेंबर रोजी बस स्टॉप चौक गंगाझरी ता. गोंदिया येथे करण्यात आली.
सविस्तर असे की, तक्रारदार शेतकर्याने महाराष्ट्र शासनाच्या मराठवाडा पॅकेज योजनेंतर्गत शेळी गट वाटप योजनेचा लाभ मिळण्याकरिता पंचायत समिती गोंदिया येथे अर्ज केला होता. त्यानुसार त्यांना शेळी गट मंजूर झाले. या योजनेंतर्गत 20 शेळ्या व 2 बोकड कृषी उत्पन्न बाजार समिती गोरेगाव येथून विक्रेत्याकडून खरेदी केले. त्यानंतर गोंदिया पंचायत समितीच्या पशुसंवर्धन विभागाकडून तक्रारदार शेतकर्यास पहिल्या टप्प्यातील अनुदानाचे 57 हजार 350 रुपये त्यांच्या खात्यात जमा झाले.
त्यानंतर तक्रारदार शेतकर्याने गोंदिया पं.स.च्या पशुसंवर्धन विभागातील पशुधन पर्यवेक्षक सव्वालाखे याला भेटून दुसर्या टप्प्यातील लाभार्थी अनुदानाची रक्कम मिळण्याबाबत विचारपूस केली. त्यावेळी सव्वालाखे याने दुसर्या टप्प्यातील अनुदानाची रक्कम देण्याकरिता तक्रारदाराकडे 10 हजार रुपये लाच रकमेची मागणी केली. तक्रारदाराला सदर रक्कम सव्वालाखे याला देण्याची मुळीच इच्छा नसल्यामुळे त्यांनी 23 नोव्हेंबर रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग गोंदिया येथे तक्रार नोंदविली.
असा रचला सापळा; रंगेहात पकडले
लाच रकमेबाबत योग्य पडताळणी करून आज गुरुवार, 25 नोव्हेंबर रोजी गंगाझरीच्या बस स्टॉप चौकात लाचेचा सापळा रचण्यात आला. या यशस्वी सापळा प्रक्रियेदरम्यान आरोपी संजय प्रेमलाल सव्वालाखे (वय 50, पशुधन पर्यवेक्षक, पं.स. गोंदिया) याने आपल्या लोकसेवक पदाचा दुरुपयोग करून मराठवाडा पॅकेज योजनेंतर्गत शेळी गट वाटप योजनेच्या दुसर्या टप्प्यातील अनुदानाची रक्कम तक्रारदारास देण्याकरिता तक्रारदाराकडे 10 हजार रुपये लाच रकमेची पंचासमक्ष मागणी केली. तसेच तडजोड करून शेवटी 8 हजारांची लाच रक्कम पंचासमक्ष स्वीकारली. त्यावेळी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने त्याला रंगेहात पकडले. यावरून आरोपीविरुद्ध गंगाझरी पोलीस ठाण्यात कलम 7 भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम 1988 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
सदर कामगिरी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक राकेश ओला, अपर पोलीस अधीक्षक मिलिंद तोतरे यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपअधीक्षक पृषोत्तम अहेरकर, सहायक फौजदार विजय खोब्रागडे, पोलीस हवालदार राजेश शेंद्रे, नापोशि योगेश उइके, रंजीत बिसेन, नितीन रहांगडाले आदींनी केली.