ग्रामीण भागातील 1 ली ते 4थी आणि शहरी भागातील 1ली ते 7वीच्या शाळा येत्या १ डिसेंबरपासून सुरू होणार

मुंबई 25: करोना संक्रमणामुळे गेली दीड वर्षाहून अधिक काळ शाळा न पाहिलेल्या चिमुकल्यांना आता शाळेत जाता येणार आहे. पाचवी ते बारावीच्या शाळा सुरू झाल्यानंतर आता इयत्ता पहिली ते चौथीचे वर्गही ऑफलाइन सुरु करण्याचा महत्त्वाचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. उर्वरित इयत्ता म्हणजे ग्रामीण भागातील पहिली ते चौथी आणि शहरी भागातील पहिली ते सातवीच्या शाळा येत्या १ डिसेंबरपासून सुरू होणार आहेत. आपल्या पाल्यांना शाळेत पाठवण्याचा निर्णय मात्र तूर्त ऐच्छिक असणार आहे. विद्यार्थ्यांना शाळेत येण्याची सक्ती केली जाणार नाही. कोविड-१९ संबंधित खबरदारीचे उपाय आणि एसओपी लवकरच जारी करण्यात येतील. मंत्रिमंडळ बैठकीत या निर्णयावर शिक्कामोर्तब झाले. तत्पूर्वी या विद्यार्थ्यांची प्रत्यक्ष शाळा सुरू करण्यासाठी आरोग्य विभागाने परवानगी दिली होती.

राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनीही मंत्रिमंडळ बैठकीनंतर पत्रकार परिषद घेऊन शाळा सुरू होण्यासंबंधी माहिती दिली. त्या म्हणाल्या, ‘या मुलांपैकी पहिलीतली मुलं अद्याप शाळेतच आलेली नाहीत. त्यामुळे त्यांच्या पालकांशी संवाद साधण्यात येईल. सर्व मुलांसाठी सुरक्षित, आरोग्यदायी वातावरण तयार करण्यात येईल.

राज्याच्या कोविड टाक्स फोर्सनेही पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांना शाळेत येण्याबाबत हिरवा कंदिल दाखवला होता. राज्यात कोविड-१९ संक्रमणग्रस्तांची संख्या गेले काही महिने सातत्याने कमी होत आहे. परिणामी परिस्थिती सामान्य होत असल्याने राज्य सरकारने टप्प्याटप्प्याने निर्बंध शिथील करत आणले आहेत.

पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांचे लसीकरण होईपर्यंत नियम व अटी पाळून शाळा सुरू करता येऊ शकतील, असे नमूद करण्यात आले आहे. तसेच १२ ते १८ वर्षे वयोगटातील विद्यार्थ्यांचे लसीकरण करण्याबाबत टास्क फोर्सने सकारात्मक शिफारसी दिल्या आहेत.

मुख्यमंत्री बैठकीस ऑनलाइन उपस्थित

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या कॅबिनेट बैठकीस ऑनलाइन उपस्थिती लावली. मुख्यमंत्री हे एच.एन.रिलायन्स रुग्णालयातून दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी झाले होते.

Share