समृध्दीचा वर्धा जिल्हयातील ५८ किमीचा महामार्ग पुर्ण
वर्धा : मुंबई-नागपूर या शिघ्रसंचार द्रूतगती महामार्गाचे जिल्हयातील बहुतांश कामे पूर्ण झाली असून प्रस्तावित 58 किमीचा महामार्ग तयार झाला आहे. या महामार्गामुळे जिल्हयातील नागरिकांना मुंबई व नागपूर या नगरांना जोडल्या जाणार असून जिल्हयाच्या विकासाला हा महामार्ग मोलाचा हातभार लावणार आहे. जिल्हयात महामार्गावर लहान मोठे 32 पूल उभारण्यात आले असून 9 उड्डान पुलाचा समावेश आहे.जिल्ह्याधिकाऱ्यांनी या महामार्गाच्या प्रगतीचा आढावा घेतला. बैठकीला यावेळी अप्पर जिल्हाधिकारी मनोजकुमार खैरनार, उपविभागीय अधिकारी सुरेश बगळे, समृध्दी महामार्गाचे अधिक्षक अभियंता प्र.र. जनबंधुन, कार्यकारी अभियंता बी.जे. मालखंडारे, रस्ते विकास महामंडळाचे निशिकांत सुके, आदी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी जिल्हयातील हिंदु हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृध्दी महामार्गाच्या कामाचा यावेळी सविस्तर आढावा घेतला. जिल्हयात सेलू, वर्धा व आर्वी या तालुक्यातून महामार्ग जात असून 34 गावांचा प्रकल्पामध्ये समावेश आहे. जिल्हयाची महामार्गाची एकुण लांबी 58 किमी इतकी असून मार्गाचे संपूर्ण काम पूर्ण झाले आहे. महामार्गाची रुंदी 120 मीटर असून सदर मार्ग 6 पदरी आहे. मार्गावर एकुण 32 पूल उभारण्यात आले असून त्यातील 5 मोठे व 27 लहान पुलांचा समावेश आहे. महामार्गावरील वाहतुक विना अडथळा होण्यासाठी 9 ठिकाणी उड्डान पूल उभारण्यात आले आहे.
जिल्हयात महामार्गावर एकुण 34 भुयारी मार्ग निर्माण करण्यात आले असून त्यात वाहनांसाठी 22 तर पादचा-यासाठी 12 भूयारी मार्गाचा समावेश आहे. जिल्हयात 2 ठिकाणी महामार्ग लगत नवनगरे उभारण्यात येत आहे. ही नवनगरे केळझर व विरुळ जवळ उभारण्यात येत आहे. गणेशपूर व रेणकापूर येथे महामार्गावर प्रवास करणा-या प्रवाश्यासांठी सुविधा केंद्र राहणार आहे तर 2 रेल्वे उड्डानपुलही उभारण्यात आले आहे. प्रवाश्यांना महामार्गावरुन प्रवास करुन आल्यानंतर जिल्हयात ईच्छित स्थळी जाण्यासाठी येळाकेळी व विरुळ येथे इंटरचेंजेसही देण्यात आले आहे.
महामार्गाच्या वाहनांमुळे वन्यप्राणी विचलित होऊ नये यासाठी वन्यप्राण्यांचा संचार असलेलया भागात दोन ठिकाणी उन्नत मार्ग राहणार आहे. जिल्हयात महामार्गाची सर्वच कामे पूर्ण झाली आहे. शासनाने रस्ता वाहतुकीसाठी सुरु करावयाचा निर्णय घेतल्यास जिल्हयातील संपूर्ण महामार्ग वाहतुकीसाठी तयार असल्याचे बैठकीत सांगण्यात आले.
जिल्हाधिका-यांनी महामार्गाची सविस्तर माहिती घेतल्यानंतर रस्त्याची जी छोटीमोठी कामे अपूर्ण राहिली असतील ती तातडीने पूर्ण करण्यात यावे. या महामार्गामुळे जिल्हयाच्या विकासाला मोठा हातभार लागणार असल्याचे जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी सांगितले.