देवरी येथे दिवाणी व फौजदारी न्यायालयाच्या नवीन इमारतीचे कोनशिला आणि भूमिपूजन थाटात

देवरी 21 – देवरी येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयाच्या नवीन इमारतीचे कोनशिला आणि भूमिपूजन आज थाटात पार पडले. यावेळी सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गोंदियाचे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीस शब्बीर अहेमद औटी हे होते. यावेळी मंचावर मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्ती आणि गोंदिया न्यायिक जिल्ह्याचे पालक न्यायाधीस अविनाश घरोटे, महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण नागपूर खंडपीठाचे न्यायिक सदस्य सेवानिवृत्त न्या. मुरलीधर गिरटकर, देवरीचे दिवाणी न्यायाधीस एम.डब्ल्यू.ए.एम.जे शेख आणि देवरी बार असोशियसनचे अध्यक्ष अॅड. प्रशांत संगीडवार हे उपस्थित होते.

भांडण-तंट्याचा न्यायनिवाडा करण्यासाठी न्यायालयाची आवश्यकता आहे. असे असले तरी न्यायालयांची संख्या वाढविण्याऐवजी समाजात भांडणतंट्यांची संख्या कमी करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न केले पाहिजे. यासाठी खटलापूर्ण आणि मध्यस्थी या प्रकारांचा जास्तीत जास्त वापर झाला पाहिजे. न्यायदानाची प्रक्रिया सुलभ आणि जलद होण्यासाठी परिपूर्ण न्यायव्यवस्था कशी उभी करता येईल, यासाठी सर्वच घटकांनी विचार करावा, असे आवाहन मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायामूर्ती तथा वरिष्ठ प्रशासकीय न्यायाधीस सुनील शुक्रे यांनी देवरी कोनशिला सोहळ्यात येथे केले

◾️कशी असणार इमारत ?

देवरी येथे उभारण्यात येणारी सुसज्ज इमारत ही पर्यावरण अनुकूल राहणार असून यामध्ये सौर उर्जा, पावसाच्या पाण्याचे संवर्धन, आणि पुनर्वापर तत्वांचा वापर केला जाणार आहे. परिणामी एवढ्या कष्टाने उभ्या राहणाऱ्या इमारतीचा वापर हा समाजाच्या अंतिम घटकांपर्यंत उत्तम आणि दर्जेदार न्याय पोचविण्यासाठी व्हावा, ही रास्त अपेक्षा आहे. यासाठी न्यायव्यवस्थेतील सर्व घटकांनी प्रयत्न केले पाहिजे. या इमारतीचे सौंदर्य जपण्याकडे ही लक्ष दिले गेले पाहिजे.

तसेच न्या. औटी आणि न्या. घरोटे यांनी सुद्धा उपस्थितांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अॅड संगीडवार यांनी केले. उपस्थितांचे आभार न्या. शेख यांनी मानले. संचलन अड. भूषण मस्करे आणि अड. आशा भाजीपाले यांनी मानले.

यावेळी न्यायाधीस मंडळी, जिल्ह्यातील न्यायालयीन कर्मचारी आणि इतर आमंत्रित मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Share