नव्या वर्षात कपडे, चपला महागणार..! केंद्र सरकारच्या या निर्णयाचा सामान्यांना फटका..

महागाईत भर घालणारी एक बातमी आहे. रेडिमेड कपड्यांची शॉपिंग करण्याचा विचार असेल, तर आताच करुन घ्या, कारण नवीन वर्षात हेच कपडे तुम्हाला आणखी महागात पडू शकतात..

जानेवारी 2022 पासून रेडिमेड कपडे, टेक्सटाइल नि चपलांची खरेदी महागणार आहे. मोदी सरकारने नवीन वर्षात या वस्तूंवरील ‘जीएसटी’ (वस्तू व सेवा कर) 5 टक्क्यांहून 12 टक्के करण्याचा निर्णय घेतला आहे. जानेवारी 2022 पासून हा नवा कर लागू होणार आहे.

सरसकट १२ टक्के जीएसटी
केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमा शुल्क बोर्डाने नुकतीय याबाबतची घोषणा केली. याआधी 1000 रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या कपड्यांवर 5 टक्के जीएसटी लागू होता.. आता जानेवारी 2022 पासून कोणत्याही किंमतीच्या कपड्यांवर तो सरसकट 12 टक्के केला जाणार आहे.

टेक्सटाइल्स (विणलेले कपडे, सिथेंटिक यार्न, पाइल कपडे, कंबल्स, टेंट, टेपेस्ट्री सारखे सामानासह) वरील जीएसटी आता 5 टक्क्यांऐवजी 12 टक्के होणार आहे. तसेच कोणत्याही किंमतीच्या फुटवेअरवरही नवा ‘जीएसटी’ दर लागू होईल. पूर्वी 1000 रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या फुटवेअरवर 5 टक्के दराने जीएसटी आकारला जात होता.

निर्णयाबाबत नाराजी
दरम्यान, मोदी सरकारच्या या निर्णयाबाबत ‘क्लॉथिंग मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन ऑफ इंडिया’ (CMAI) यांनी नाराजी व्यक्त केलीय. जीएसटीमध्ये वाढ करण्यात आल्याने त्याचा मोठा फटका ग्राहक वर्गाला बसू शकतो. त्याचा परिणाम कापड उद्योगावर होण्याची शक्यता आहे.

कच्च्या मालाच्या किमतीत, तसेच मालवाहतूक खर्चात मोठी वाढ झाल्यामुळे आधीच कापड उद्योग गटांगळ्या खात आहे. अशा परिस्थितीत जीएसटी दरात करण्यात आलेली वाढ, हा आणखी एक मोठा धक्का असल्याचे ‘सीएमएआय’ने म्हटले आहे.

कपड्यांच्या किंमती एकदम वाढतील
बाजारात 80 टक्क्यांहून अधिक कपड्यांची किंमत 1000 रुपयांपेक्षा कमी आहे. कपड्यांच्या किंमतीत 15-20 टक्के वाढ अपेक्षित होती. त्यात ‘जीएसटी’ दरात वाढ केल्याने कपड्याच्या किंमतीत एकदम वाढ होऊ शकते नि त्याचा परिणाम सर्वसामान्यांवर होणार असल्याचे ‘सीएमएआय’चे म्हणणे आहे.

Share