दहावी, बारावीच्या परीक्षा फेबुवारी-मार्चमध्येच : शिक्षण मंडळाकडून वेळापत्रक तयार

मुंबई : राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येणाऱया दहावी, बारावीच्या परीक्षा फेब्रुवारी-मार्च महिन्यातच होणार आहेत. शिक्षण मंडळाने दोन्ही परीक्षांचे सविस्तर वेळापत्रक तयार केले असून राज्य सरकारने वेळापत्रकाला मंजुरी दिल्यास येत्या काही दिवसांत परीक्षांच्या तारखा जाहीर केल्या जाणार आहेत.
सर्वोच्च न्यायालयात सीबीएसई, आयसीएसई बोर्डाच्या दहावी, बारावी परीक्षेसंदर्भात गुरुवारी झालेल्या अंतिम सुनावणीनंतर देशभरात बोर्डाच्या परीक्षा ऑफलाइन पद्धतीनेच होणार यावर शिक्कामोर्तब झाले आहे. या पार्श्वभूमीवर राज्य शिक्षण मंडळाकडून दहावी, बारावी परीक्षांचे वेळापत्रक कधी जाहीर केले जाणार याविषयी विद्यार्थी, पालकांसह शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयातही उत्सुकता होती.


राज्यात दरवर्षी बोर्डाच्या दहावी, बारावीच्या लेखी परीक्षा या फेब्रुवारी-मार्च महिन्यात घेतल्या जातात. त्याआधी शाळास्तरावर तोंडी, प्रात्यक्षिक आणि श्रेणी विषयांच्या परीक्षांचे आयोजन करण्यात येते. बारावीच्या परीक्षा या फेब्रुवारीच्या तिसऱया आठवडय़ात तर दहावीची परीक्षा मार्च महिन्याच्या पहिल्या आठवडय़ात घेण्यात येते. यंदाच्या वर्षीदेखील दहावी, बारावी परीक्षांचे आयोजन फेब्रुवारी-मार्च महिन्यातच करण्यात आले आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे यंदा शाळा उशिराने सुरू झाल्या आहेत. त्यामुळे परीक्षादेखील किमान एक आठवडा उशिराने सुरू होण्याची शक्यता आहे.

– राज्य शिक्षण मंडळाच्या दहावी, बारावीच्या परीक्षा पारंपरिक पद्धतीने होणार
– लेखी परीक्षेआधी शाळा, कनिष्ठ महाविद्यालय स्तरावर प्रात्यक्षिक, तोंडी, श्रेणी विषयांच्या परीक्षा पार पडणार
– लेखी परीक्षांचे एकूण गुण आणि परीक्षेचा कालावधी पूर्वीप्रमाणेच असणार.
– कोरोना प्रतिबंधक उपाय म्हणून सोशल डिस्टन्सिंगचे पालन होण्यासाठी परीक्षा केंद्रांची संख्या वाढणार

राज्य शिक्षण मंडळाकडून दहावी, बारावी परीक्षांचे वेळापत्रक मान्यतेसाठी शालेय शिक्षण विभागाकडे पाठविण्यात आले आहे. येत्या काही दिवसांत शिक्षण विभागाकडून वेळापत्रकाला मंजुरी मिळण्याची शक्यता आहे. राज्य सरकारने मान्यता दिल्यास प्रात्यक्षिक, तोंडी आणि श्रेणी विषयांसह लेखी परीक्षांचे सविस्तर वेळापत्रक मंडळाच्या वेबसाईटवर ऑनलाइन जाहीर करण्यात येईल. तोपर्यंत विद्यार्थी, पालकांनी सोशल मीडियावरील किंवा अन्य माध्यमातून जाहीर होणाऱ्या वेळापत्रकांवर विश्वास ठेवू नये.

Share