गुड न्यूज :कोणत्याही धान खरेदी केंद्रावर शेतकरी विकू शकणार आपले धान

– जनतेच्या आमदाराचे (विनोद अग्रवाल ) प्रयत्न यशस्वी
– नोटिफिकेशन निघणार, शेतकऱ्यांना दिलासा मिळणार


प्रतिनिधी / गोंदिया : शेतकरी बांधव आपले धान शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्रावर विक्री करत असतात. या साठी प्रत्येक गावाला धान खरेदी केंद्र नेमून दिलेले असते आणि त्यांना त्याच संस्थेत नोंदणी करून आपले धान विक्रीसाठी वाट पहावी लागते. कोणत्या संस्थेला ३ गावे तर कोणत्या संस्थेला १० गावे धान खरेदीसाठी दिली जातात यामुळे समतोल राहत नाही आणि अनेक अडचणींचा सामना शेतकरी बांधवांना करावा लागतो. कोणत्याही धान खरेदीकेंद्रावर शेतकरी बांधवाना धान विक्री करण्याची मुभा दिल्यास धान खरेदी केंद्रामध्ये स्पर्धा वाढेल आणि याचा लाभ थेट शेतकरी बांधवाना होईल म्हणून शेतकरी बांधवाना धान कोणत्याही केंद्रांवर विकण्याची मुभा देणे बाबत आमदार विनोद अग्रवाल यांनी अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांची मंत्रालय येथे भेट घेतली असता शासन शेतकरी बांधवाना कोणत्याही धान खरेदी केंद्रावर धान विक्री करणेसाठी सकारात्मक असल्याचे मंत्री महोदयांनी सांगितले आणि तसे नोटिफिकेशन सुद्धा काढणार असल्याचे आश्वासन अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी आमदार विनोद अग्रवाल यांना दिले.


शेतकरी बांधवाना कोणत्याही केंद्रावर आपले धान विकता यावे यासाठी आमदार विनोद अग्रवाल यांनी जिल्हाधिकारी गोंदिया तसेच जिल्हा मार्केटिंग अधिकारी यांची भेट घेत त्यांना विषय शेतकरी बांधवांच्या हिताचा आहे असे पटवून दिले होते त्यावर जिल्हा मार्केटिंग अधिकारी यांच्या मार्फत प्रस्ताव मुंबई दरबारी सादरकरण्यात आला होता.

मंत्री छगन भुजबळ, विभागाचे सचिव डॉ विजय वाघमारे यांची मुंबई येथे भेट घेऊन आमदार विनोद अग्रवाल यांनी हा विषय निकाली काढणार असल्याचे सांगितले ज्यामुळे शेतकरी बांधवाना आपले धान कोणत्याही सेंटर वर विक्री करण्याचे मार्ग आता खुले होणार आहेत.  

शेतकऱ्यांचा फायदा, धान खरेदी केंद्रांमध्ये स्पर्धा वाढणार
बारदाने उपलब्ध नाही, गोदामात जागा नाही यामुळे अनेकवेळा धान खरेदी खोळंबल्यात जमा होती मात्र आता कोणत्याही धान खरेदी केंद्रावर धान विक्री करण्याच्या निर्णयाने धान खरेदी केंद्रांमध्ये स्पर्धा होणार असून धान खरेदी अधिक तीव्र गतीने होईल तसेच शासनाचा वेळ आणि पैसा देखील वाचेल. सोबतच शेतकरी बांधवांची होणारी पायपीट सुद्धा थांबणार आहे.

Print Friendly, PDF & Email
Share