जिल्हा परिषद व त्याअंतर्गत 8 पंचायत समित्यांची सार्वत्रिक निवडणूकीसाठी मतदार यादी जाहीर

गोंदिया 11 : राज्य निवडणूक आयोगाने 9 नोव्हेंबर 2021 च्या आदेशानुसार गोंदिया जिल्हा परिषद व 8 पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणूकीसाठी मतदार यादी तयार करण्याचा कार्यक्रम घोषित केला आहे. त्याकरीता महाराष्ट्र विधानसभेची 1 नोव्हेंबर 2021 रोजी प्रसिध्द झालेली मतदार यादीचा वापर करण्यात येणार आहे.

सदर कार्यक्रमानुसार गोंदिया जिल्हा परिषद व त्याअंतर्गत 8 पंचायत समित्यांच्या निवडणूकांसाठी निवडणूक विभाग/निर्वाचन गणाकरीता प्रभागनिहाय मतदार यादीचे विभाजन करुन सदर प्रारुप मतदार यादी नागरिकांचे
अवलोकनार्थ 12 नोव्हेंबर 2021 रोजी प्रसिध्द करण्यात येईल व त्यावर 17 नोव्हेंबर 2021 पर्यंत हरकती व सूचना मागविण्यात येईल. अंतिम व अधिप्रमाणीत मतदार यादी 24 नोव्हेंबर 2021 रोजी संबंधीत ग्रामपंचायत
कार्यालय व शासकीय कार्यालयातील सूचना फलकावर प्रसिध्द करण्यात येईल. सदर मतदार यादीबाबत काही आक्षेप/हरकती असल्यास सदर आक्षेप व हरकती संबंधीत तहसिलदार यांचे कार्यालयात विहित मुदतीत दाखल करावे. विहित मुदतीनंतर प्राप्त होणाऱ्या आक्षेप/हरकती विचारात घेतले जाणार नाही.

मतदार यादीमध्ये ज्या मतदारांची नावे लगतच्या गावामध्ये व नगरपरिषद क्षेत्रामध्ये सुध्दा मतदार म्हणून नोंदविली आहेत किंवा मतदार गट व मतदार गणामधील क्षेत्रात एकापेक्षा जास्त ठिकाणी नोंदविली आहेत अशा दुबार मतदारांनी आपले नाव फक्त एकाच जागी राहील व दुबार नाव कमी करण्याबाबत अर्ज तात्काळ संबंधीत मतदार केंद्रस्तरीय अधिकारी तसेच तहसिलदार यांचेकडे सादर करावा. ज्या मतदारांची मतदान यादीमध्ये दुबार नावे आहेत असे मतदार मतदान केंद्रावर आल्यास त्यांच्याविरुध्द तोतयेगिरी व बोगस मतदान करणारा म्हणून कायदेशीर कार्यवाही/फौजदारी खटला दाखल करण्याची कार्यवाही करण्यात येईल. तसेच ज्या विवाहीत महिलांची नावे मुळ रहिवास व सासरकडील गाव या दोन्ही ठिकाणी समाविष्ट असतील त्यांनी त्यांचे सद्यस्थितीतील रहिवास ठिकाणाचे नाव कायम ठेऊन अन्य ठिकाणी नाव कमी करण्याबाबत अर्ज सादर करावा अन्यथा यास दुबार मतदार नोंद म्हणून गृहीत धरण्यात येईल, याची संबंधीतांनी नोंद घ्यावी. असे जिल्हाधिकारी नयना गुंडे यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे.

Print Friendly, PDF & Email
Share