सुगंधित तंबाखू व ट्रकसह 24.41 लाखांचा माल जप्त

गोंदिया 27: महाराष्ट्र राज्यात सुगंधित तंबाखूवर प्रतिबंध लावण्यात आला आहे. परंतु मोठ्या प्रमाणात याची तस्करी सुरू आहे. डुग्गीपार पोलिसांनी कारवाई करून सुगंधित तंबाखू व ट्रकसह 24.41 लाखांचा माल जप्त केला आहे. ही कारवाई आज मंगळवार, 26 ऑक्टोबर रोजी करण्यात आली.

रायपूरकडून नवेगावबांधकडे जाणार्‍या एका ट्रकमध्ये प्रतिबंधित सुगंधी तंबाखूची वाहतूक होत आहे. अशी माहिती 26 ऑक्टोबर रोजी डुग्गीपारचे पोलीस निरीक्षक सचिन वांगडे यांना गोपनीय सूत्रांकडून मिळाली. त्यांनी आपल्या सहकार्‍यांसह नवेगाव टी-पॉइंट कोहमारा चौकात नाकाबंदी करून ट्रकची तपासणी सुरू केली.

यात ट्रक क्रमांक एमएच 40/बीजी 3444 मध्ये ठेवलेल्या 27 बॉक्समध्ये सुगंधित तंबाखूचे (मजा 108) 500 ग्रामचे 538 बॉक्स किंमत 10,25,670, प्लास्टिक पोतीत सुगंधित तंबाखू ईगलचे 400 ग्रामचे 400 पॉकेट एकूण किंमत 2,16000 तथा ट्रकची किंमत अंदाजे 10 लाख रुपये अशाप्रकारे 22 लाख 41 हजार 670 रूपयांचा माल जप्त करून डुग्गीपार पोलीस ठाण्यात जमा करण्यात आला. 

ट्रकमध्ये मिळालेल्या प्रतिबंधित सुगंधित तंबाखू संदर्भात भंडाराचे अन्न सुरक्षा सहायक आयुक्त, अन्न व औषधी प्रशासन विभाग भंडारा येथे पत्राद्वारे माहिती देण्यात आली. सदर प्रकरणात संपूर्ण मालाची तपासनी करून लिखित अहवाल व रिपोर्टच्या आधारावर डुग्गीपर पोलिसांनी आरोपी क्रमांक 1 शाहरुख नासिर खान (वय 27) रा. नागपूर, गणेश गुप्ता रा. चंद्रपूर यांच्या विरुद्ध भादंविच्या कलम 188, 272, 273, 328 सहायक कलम 3, 26 (2)(i), 26(2)(iv), 27(2)(e), 30(2)( a), 59 अन्न सुरक्षा व मानक अधिनियम 2006 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

सदर कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक विश्व पानसरे, अपर पोलीस अधीक्षक अशोक बनकर देवरी कॅम्प, उपविभागीय पोलीस अधिकारी जालंधर नालकुल देवरी यांच्या मार्गदर्शनात डुग्गीपारचे पोलीस निरीक्षक सचिन वांगडे, सपोनि संजय पांडरे, नापोशि झुमन वाढई, पोशि महेंद्र सोनवाने यांनी केली.

Share