तिरोडा पोलिसांचा ऑनलाईन मोबाईल सट्टा अड्ड्यावर छापा | 4 आरोपींना अटक, ₹30.09 लाखांचा मुद्देमाल जप्त,

गोंदिया जिल्ह्यातील सर्वात मोठी कारवाई

तिरोड 27 : सध्याचे युग अत्याधुनिक तंत्रज्ञानाचे आहे. त्यामुळे अवैध धंद्यातही या तंत्रज्ञानाचा व आधुनिक उपकरणांचा उपयोग करून गैरमार्गाने कोट्यवधीची माया साठविली जात आहे. शहरात ऑनलाईन मोबाईल सट्टा जोमात सुरू आहे. त्यातच तिरोड्याचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक योगेश पारधी यांनी या अवैध धंद्यावर आळा घालण्यासाठी कंबर कसली आहे. ऑनलाईन मोबाईल सट्टा अड्ड्यावर तिरोडा पोलिसांनी छापा मारून 4 आरोपींना अटक केली आहे. तर 30 लाख 9 हजार 412 रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. गोंदिया जिल्ह्यातील ही सर्वात मोठी कारवाई तिरोड्याच्या शास्त्री वॉर्डात मंगळवार, 26 ऑक्टोबरच्या रात्री 9.45 वाजता करण्यात आली.

सविस्तर असे की, 26 ऑक्टोबरच्या रात्रीला पोलीस निरीक्षक योगेश पारधी पेट्रोलिंग करीत असताना गुप्त बातमीदारामार्फत त्यांना शास्त्री वॉर्ड तिरोडा येथे ऑनलाईन मोबाईल सट्टा अड्डा सुरू असल्याची माहिती मिळाली. शास्त्री वॉर्डातील मनोहर तरारे हा आपल्या घरी घराच्या चारही बाजूला सीसीटीव्ही कॅमेरे लावून, तसेच घराच्या समोरील दाराला बाहेरून कुलूप लावून वरच्या माळ्यावर ऑनलाईन मोबाईलवर सट्टा लावून जुगार खेळवित होता. या माहितीवरून पंचाच्या समक्ष 26 ऑक्टोबरच्या रात्री 9.45 वाजता छापा टाकण्यात आला.

दरम्यान मनोहर तरारे याच्या घराच्या पहिल्या माळ्यावरील एका खोलीत ऑनलाईन मोबाईलवर सट्टा सुरू होता. तेथे सट्ट्याचे आकडे लिहून हारजीतचा जुगार खेळताना चार आरोपी मिळून आले. या आरोपींमध्ये (1) मनोहर श्रीराम तरारे (वय 44) रा. शास्त्रीवॉर्ड तिरोडा, (2) सुरेश चमरु घोडमारे (वय 40) रा. संत कवरराम वॉर्ड तिरोडा, (3)डेव्हिड रविकिरण बडगे (वय 27) रा. आंबेडकर वॉर्ड तिरोडा व (4)संदीप चरणदास गजभिये (वय 38) रा.महात्मा फुले वॉर्ड तिरोडा यांचा समावेश आहे.

ऑनलाईन मोबाईल सट्टा : ₹30.09 लाखांचा मुद्देमाल जप्त

ऑनलाईन मोबाईल सट्टा

सदर कारवाईत आरोपींजवळून (1) नगदी 6 लाख 53 हजार 900 रुपये, (2) 16 नग विविध कंपनीचे मोबाईल हॅन्डसेट किंमत 1 लाख 81 हजार रुपये, (2) 5 नग मोबाईल चार्जर किंमत 1 हजार 200 रुपये, (3) 3 नग कॅल्क्युलेटर किंमत 2 हजार 700 रुपये, (4) 1 सीसीटीव्ही डीविआर किंमत 15 हजार रुपये, (5) 1 नग लाकडी टेबल किंमत 6 हजार रुपये, (6) 3 नग स्टील खुर्ची किंमत 1 हजार 500 रुपये, (4) 1 नग व्हील चेयर किंमत 15 हजार रुपये, (7) 2 लाकडी प्याड किंमत 1 हजार रुपये, (8) 2 मोटर सायकल किंमत 1 लाख 30 हजार रुपये, (9) 1 फोर व्हीलर जीप कंपनीची कार (एमएच 35/ए आर 7777) किंमत 20 लाख रुपये असा एकूण 30 लाख 09 हजार  412 रूपयांचा (तीस लक्ष नऊ हजार चारशे बारा रुपये) मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. 

आरोपींविरुद्ध कलम 4, 5 महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा अन्वये गुन्हा नोंद करून त्यांना अटक करण्यात आलेली आहे. सदर कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन यादव यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक योगेश पारधी, सोबत पोलीस हवा कवलपालसिंग भाटिया, नापोशि मुकेश थेर, पंकज सवालाखे, पोलीस शिपाई एकतर शेख, इरफान शेख, प्रशांत काहलकर, महिला पोलीस शिपाई नितु सपाटे, चालक पोलीस शिपाई पारधी यांनी केलेली आहे.

अवैध धंदे दिसून आल्यास त्वरित कळवा

नागरिकांना सुरक्षित जीवन जागता यावे. परिसरात शांतता व सुव्यवस्था नांदावी. यासाठी अवैध धंद्यावर कारवाई करण्याचे सत्र सुरू आहे. तिरोडा पोलीस ठाणे क्षेत्रात कुठेही अवैध धंदे दिसून आल्यास आम्हाला त्वरित कळवावे. आपले नाव गुप्त ठेवण्यात येईल.

-योगेश पारधी,

पोलीस निरीक्षक, पोलीस ठाणे, तिरोडा.

Share