आपत्ती व्यवस्थापनामधील मिशन चांदनी…… हा जीवनातील सर्वात कठीण अनुभव

राज्य आपत्ती प्रतिसाद दल नागपूर व जिल्हा शोध बचाव पथक यांचा सर्वात वेगळा आणि कठीण रेस्क्यू ऑपरेशन- सायफन

गोंदिया जिल्ह्यातील आमगाव तालुक्यातील जवरी/गोरठा या गावाजवळ पुजारीटोला येथून वाहणाऱ्या मुख्य कालव्यात कुमारी चांदनी पाथोडे वय 11 वर्ष, निवासी गोरठा, ही मुलगी दिनांक 15 ऑक्टोबर 2021 रोजी सकाळी दहा वाजेदरम्यान म्हशी चरायला गेली असता कालव्यात पडून वाहून गेली होती.

सदर मुलीचा शोध घेण्यासाठी तात्काळ तालुकास्तरीय चमु व स्थानिक ढिवर समाजातील लोकांची मदत घेऊन दयाराम भोयर, तहसीलदार आमगांव यांनी शोध मोहीम राबवली. परंतु सायंकाळपर्यंत कोणतेही यश मिळाले नव्हते. दुसरीकडे दसऱ्याच्या निमित्ताने दुर्गा मातेच्या प्रतिमेच्या विसर्जनाकरिता जिल्हा शोध व बचाव पथकाला रजेगाव येथील कोरणी घाटात तैनात करण्यात आले होते. विसर्जनही महत्त्वाचे होते कारण, या ठिकाणी कोणतीही अप्रिय घटना घडायला नको, याचेही नियोजन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात येत होते.

आमगाव तालुक्यातील घटनेच्या दुसऱ्या दिवशी दिनांक 16 ऑक्टोबर 2021 रोजी शोध कामासाठी जिल्हास्तरीय पथक रवाना करण्यात आले. घटनास्थळापासून 2 किलोमीटर पर्यंत पुढे बेपत्ता चांदनीचा शोध लावण्यात आला परंतु तेवढ्यातही यश मिळाले नाही. कालव्याच्या माध्यमातून पुढे शोध घेताना अचानक “सायफन” आढळला. सायफन हा कुठलाही प्राणी किंवा जनावर नाही, हा एक भुयारी मार्ग आहे. सायफन ही इंग्रज कालीन व्यवस्था आहे. यामध्ये पाण्याच्या निकासीसाठी कालव्याच्या मधात किंवा सामोर येणारे नदी-नाले किंवा रस्ते यांना बाधित न करता त्यांच्या खालून व्ही आकार मध्ये ( \__/ या आकारामध्ये) नदी-नाले यांच्या खालून पाण्याचा रस्ता तयार केला जातो यालाच सायफन म्हंटल्या जातो. दरम्यान या भागाची शहानिशा केल्यानंतर याच ठिकाणी चांदनी याचा मृतदेह अडकला असेल असा प्राथमिक अंदाज आला. कालव्याचा प्रवाह सुरू होता, त्यामुळे पुजारीटोला येथून कालव्यात विसर्गाचे पाणी बंद करण्यात आले. जवळपास 24 तासानंतर पाणी कमी झाले व शोध कामाला गती मिळाली. परंतु तोपर्यंत सायंकाळ झाली होती आणि दुसऱ्या दिवशीचे शोधकार्य थांबविण्यात आले.

परत तिसऱ्या दिवशी म्हणजे दिनांक 17 ऑक्टोबर 2021 रोजी जिल्हास्तरीय शोध व बचाव पथक सकाळपासून शोध कामात व्यस्त झाले. आज सायफनच्या पुढे शोध घेण्यात आला, तरीही बेपत्ता चांदनी सापडली नाही. शोध चमूचे सदस्य परत आले व घटनास्थळापर्यंत पुन्हा गेले, तरीही काहीच प्रगती झाली नाही. शेवटी पुन्हा सायफन कडे आम्ही आलो. एवढ्यातच तिसरा दिवसही संपला. तीन दिवस लोटूनही चांदनी बेपत्ता होती. दुसरीकडे या घटनेमुळे गावकऱ्यांमध्ये व्याप वाढत होता. शेवटी प्रशासनावर त्याचा ताण येऊ लागला. या घटनेवर जिल्हाधिकारी नयना गुंडे मॅडम यांची नजर असून राज्य आपत्ती प्रतिसाद दल यांना बोलविण्याची तयारी झाली. कारण सायफन हा कालव्याचा भुयारी मार्ग होता आणि तो मार्ग पाण्याने पूर्णपणे बाधित होता. भुयारी सायफनमध्ये ऑक्सिजनची कमतरता होती तसेच लोखंडी अँगल पण होते. त्यामुळे रेस्क्यू करणाऱ्या लोकांना जिवाचा मोठा धोका होता.

राज्य आपत्ती प्रतिसाद दल नागपूर यांना बोलविण्यासाठी जिल्हाधिकारी महोदयांनी परवानगी दिली व लगेच मंत्रालयाकडून पाठपुरावा करण्यात आला. शेवटी घटनेच्या चौथ्या दिवशी दिनांक 18 ऑक्टोबर 2021 रोजी आमगाव तालुक्यातील जवरी/गोरठा येथे SDRF ची चमू पोहोचली. मनात आत्मविश्वास होता की नक्कीच आता बेपत्ता चांदनी सापडेल. मी घटनास्थळावर पोहोचलो, SDRF च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा केली परंतु सायफन ची भौगोलिक परिस्थिती पाहता SDRF च्या रेस्क्यूअर्स यांना जीवाचा धोका असल्याचे त्यांच्या वरिष्ठांकडून सांगण्यात आले, हे खरं होतं कारण तीन दिवसाच्या शोध कामात आम्हाला हा अनुभव आला होता.

आता काय………. चौथा दिवस अजूनही मुलगी बेपत्ता….. भुयार कालव्यात सर्च ऑपरेशन म्हणजे जीव गमावण्या सारखेच. गावकरी व राजकीय लोकांचा प्रेशर…… परिस्थितीवर नजर ठेवून जिल्हाधिकारी यांनी पोलीस अधीक्षक विश्वा पानसरे,अपर जिल्हाधिकारी राजेश खवले, निवासी उपजिल्हाधिकारी जयराम देशपांडे यांच्यासोबत महत्वाची बैठक करून शेवटी पूर्ण कॅनल रिकामी करण्याचा निर्णय घेतला. मिशन थोडेशे अवघड वाटत होते, परंतु वरिष्ठांनी फ्री हॅन्ड दिले व घटनास्थळी काय निर्णय घ्यायचं ती स्वतंत्रता दिल्यामुळे आत्मविश्वास वाढला होता.

कालव्याच्या दोन्ही भागात मातीचे बंधारे बांधून पाणी अडवण्याचे नियोजन झाले. यानंतर सायफनच्या दोन्ही बाजूला 10 ते 15 मोटर पंप लावून कालव्याच्या पाण्याचा उपसा करून भुयारी कालवा रिकामा करण्यात आला. यासाठी जवळपास पाच ते सहा तास लागले. सायफन काही प्रमाणात रीकामा झाल्यानंतर SDRF नागपूर व जिल्हा शोध व बचाव पथकाच्या सदस्यांनी रेस्क्यू करून चांदनीचा मृतदेह शोधून काढला. परंतु “सायफन” हा रेस्क्यू ऑपरेशन सर्वात कठीण आणि धोकादायक होता असे, पोलीस निरीक्षक बादल बिस्वास, राज्य आपत्ती प्रतिसाद दल, नागपूर यांनी आपल्या अनुभवातून सांगितले.

या घटनेत गावकरीच सर्वात जास्त संतापले होते परंतु ऐनवेळी प्रशासनाची मदतही त्यांनीच केली, कालव्यात मातीचा बंधारा असो किंवा पाणी उपसा करण्यासाठी मोटरपंप असो या सर्व बाबी त्यांच्यामुळेच शक्य झाली. दुसरीकडे गावकऱ्यांचे रस्ता रोको आंदोलनाला पोलीस आणि महसूल प्रशासन यांनी शांत केले. कानून व्यवस्था कडक ठेवण्यासाठी पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी व ठाणेदार यांनी मेहनत घेतली. कालव्याचे पाणी रोखून सायफन रिकामी करण्यासाठी सिंचन विभागाचे कार्यकारी अभियंता व त्यांच्या चमूने प्रयत्न केले. विद्युत विभागानेही या रेस्क्यू ऑपरेशनमध्ये महत्वाची भूमिका बजावली. महसूल प्रशासनाकडून जिल्हास्तरावरून वरिष्ठ अधिकारी आणि तहसीलदार आमगाव यांनी विशेष जबाबदारी पार पाडली. शेवटी मिशन चांदनी हे टीमवर्क च्या माध्यमातून साध्य झाले. जिल्हाधिकारी नयना गुंडे यांच्या मार्गदर्शनात तसेच पोलीस अधीक्षक विश्वा पानसरे यांच्या नेतृत्वात सदर कामगिरी करण्यात आली.SDRF व जिल्हा शोध व बचाव पथक

जिल्हास्तरीय पथक
तहसीलदार आमगांव दयाराम भोयर, सहा.पो.नि.नाले, शोध बचाव पथकाचे सदस्य नरेश उके, राजकुमार खोटेले, राजकुमार बोपचे, जसवंत रहांगडाले, रवि भांडारकर, संदीप कराडे, दिनू दिप, राज अंबादे, सुरेश पटले, चालक- मंगेश डोये, इंद्रकुमार बिसेन चुंन्नीलाल मुटकुरे, जबराम चीफ चिखलोंडे, गिरधारी पतैह, चिंतामण गिरहेपुंजे यांनी शोध काम केले.

Share