राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी रुपाली चाकणकरांच्या नावावर शिक्कामोर्तब?

मुंबई: राज्य महिला आयोगाचं अध्यक्षपद आता राष्ट्रवादी काँग्रेसकडे जाण्याची दाट शक्यता आहे. कारण राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला आघाडीच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालं असल्याचं सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. त्यामुळे रुपाली चाकणकर यांच्याकडे लवकरच नवीन जबाबदारी येण्याची दाट शक्यता आहे.

महिला सुरक्षेच्या प्रश्नावरून रूपाली चाकणकर आक्रमक राहिल्या आहेत. सध्या रूपाली चाकणकर यांच्या नावाची अधिकृत घोषणा झाली नसली तर राज्य आयोगाच्या अध्यक्षपदासाठी त्यांचं नाव जवळजवळ निश्चित असल्याची चर्चा आहेे. महिला आयोगाच्या रिक्त जागेवर काँग्रेसने देखील दावा केला होता. पण राष्ट्रवादीकडून समोर येत असलेल्या नावाने काँग्रेसची शिफारस मागे पडली.

महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा विजया रहाटकर यांनी 4 फेब्रुवारी 2020ला महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर महिला आयोगाच्या अध्यक्षाची जागा गेल्या 20 महिन्यांपासुन रिक्त आहे. महाविकास आघाडी सरकारकडून या पदावर कोणाची नेमणूक करण्यात आली नव्हती. पण साकीनाका घटना आणि राज्यात महिला अत्याचाराच्या वाढत्या घटना बघता या रिक्त जागेचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला.

राज्य महिला आयोगाच्या या रिक्त जागेसाठी राष्ट्रवादीकडून पक्षाच्या महिला आघाडीच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर, माजी आमदार विद्या चव्हाण आणि माजी सनदी अधिकारी चंद्रा अय्यंगर यांच्या नावाची जोरदार चर्चा होती. पण अखेर महिला आयोगाच्या रिक्त जागेसाठी राष्ट्रवादीकडून रूपाली चाकणकरांची वर्णी लागली आहे. याबद्दल लवकरच अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे.

Share