देवरीच्या स्वच्छता कर्मचाऱ्यांनी उठवला शोषणाविरुद्ध आवाज
◾️नियमबाह्य काम आणि आर्थिक शोषण होत असल्यामुळे केली जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनामार्फत तक्रार
◾️कचरा संकलनावर झाला परिणाम
डॉ. सुजित टेटे
देवरी 13: नगरपंचायत देवरी येथील अस्थायी स्वच्छता कर्मचाऱ्यांनी ठेकेदाराकडून आर्थिक आणि मानसिक शोषण होत असल्यामुळे कामबंद आंदोलन पुकारला असून नगरपंचायतीच्या प्रांगणात बसून शोषणाबद्दल निषेध व्यक्त केला आहे.
स्वच्छता कर्मचाऱ्यांनी प्रसिद्ध पत्रकाद्वारे सफाई कंत्राटदार शासकीय नियमांना डावलून कमीत कमी रोजंदारी पेक्षाही कमी रोजंदारी देत असून पूर्व नगरसेवक मानसिक त्रास देत असल्याचे पत्रकात नमूद केलेले आहे.
नगरपंचायत प्रांगणात आंदोलन करणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांनी एकूण 7 मागण्या केलेल्या असून शासकीय नियमानुसार त्यांना वेतन देण्यात यावे , सुरक्षाविषयक किट उपलब्ध करून देण्यात यावी , दर महिन्याला पीएफ आणि वेतन बँक खात्यात जमा करावे , वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्यात यावी. या प्रमुख मागण्या यावेळी नगरपंचायत प्रशासनासमोर मांडण्यात आल्या.
मुख्याधिकारी अजय पाटणकर यांनी दिवाळी पूर्वी योग्य निर्णय घेऊन संबंधित सफाई कर्मचाऱ्यांनी आरोप केलेल्या कंत्राटदारावर नोटीस देऊन मागण्यापुर्ण करण्याचे , नियमानुसार वेतन देण्याचे आश्वासन दिल्या नंतर सफाई कर्मचाऱ्यांनी आंदोलन मागे घेयल्याचे वृत्त आहे.
सफाई कंत्राटदार आणि काही माजी नगरसेवकांवर मानसिक छळाचा आरोप :
नुकताच महाराष्ट्रात निवडणुकीचा बिगुल वाजला आहे. देवरी नगरपंचायतीत काही माजी नगरसेवक आणि नवखे उमेदवार तयारीला लागलेले बघावयास मिळत असून आपल्या पदाचा आणि राजकीय प्रभाव दाखवून आणि नगरपंचायतीच्या अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने स्वच्छता कर्मचाऱ्यांकडून आपल्या संभावित उमेदवारी प्रभागात सफाई कर्मचाऱ्याकडून दमदाटी देऊन , नोकरीवरून काढून देण्याची धमकी देऊन, नियमबाह्य काम करवून घेत , चांगलाच प्रचार करीत असल्याचे सांगण्यात आले. सदर घटनेमुळे सफाई कर्मचाऱ्यांमध्ये रोष बघावयास मिळाला आहे.
नगरपंचायत सदर प्रकरणी काय कारवाई करणार याकडे जनतेचे लक्ष केंद्रित झालेले आहे.
सफाई कंत्राटदाराला नोटीस दिली असून अटी व शर्ती नुसार काम न केल्यास कंत्राट रद्द करण्यात येणार असल्याची प्रतिक्रिया मुख्याधिकारी अजय पाटणकर यांनी दिली.