कोर्टात गोळीबार, 1 गँगस्टरसह 2 हल्लेखोरांचा मृत्यू

नवी दिल्ली : नवी दिल्लीमधल्या रोहिणी जिल्हा न्यायालयात गोळीबार झाला आहे. कोर्ट क्रमांक 206 मध्ये ही घटना घडली आहे. या गोळीबार आणि नंतरच्या चकमकीत एक गँगस्टर आणि दोन हल्लेखोरांचा जागीच मृत्यू झाला आहे. या संपूर्ण घटनेत जवळपास 35-40 गोळ्या झाडल्या गेल्या. याठिकाणी गँगस्टर अखिल गोगी याला ठार करण्यासाठी हल्ला करण्यात आला होता. त्याचा जागीच मृत्यू झाला आहे. तर पोलिसांनी प्रत्युत्तरात केलेल्या गोळीबारात दोन हल्लेखोरांचाही जागीच मृत्यू झाला. हल्लेखोर हे वकिलांच्या वेशामध्ये आले होते. या घटनेमध्ये एक वकील महिलादेखील जखमी झाली आहे. गोगी म्हणजेच जितेंदर मानवर 7 लाखांचं बक्षिस जाहीर करण्यात आले होते.

“गँगस्टर गोगी उर्फ जितेंद्र मानला रोहिणी कोर्टात सुनावणीसाठी नेत असताना दोन गुन्हेगांरांनी त्याच्यावर गोळीबार केला. या हल्ल्याला प्रत्त्युत्तर म्हणून पोलिसांनी केलेल्या हल्ल्यात दोन्ही गुन्हेगारांचा मृत्यू झाला आहे. यापैकी एकावर 50 हजार रुपयांचं बक्षीस जाहीर करण्यात आले होते,” असे दिल्लीचे पोलीस आयुक्त राकेश अस्थाना यांनी स्पष्ट केले आहे. “अशा प्रकारच्या घटना रोखण्यासाठी बार काऊन्सिलने वकिलांना खास असे ओळखपत्र द्यायला हवे. त्या ओळखपत्रांचं बनावट ओळखपत्र तयार करता येऊ नये म्हणून त्यात चीपसारखी काहीतरी व्यवस्था असावी. प्रत्येक कोर्टात प्रवेशापूर्वी त्याची तपासणी केली जावी. तसंच देशातील सर्व कोर्टात ते वैध असावे,” असे मत कोर्टातील कर्मचारी अतुल यांनी बीबीसीबरोबर बोलताना व्यक्त केलं. गोगी म्हणजेच जितेंदर मान यांना पोलिसांनी सुनावणीसाठी रोहिणी येथील न्यायालयात आणलं त्याचवेळी त्यांच्यावर फायरिंग करण्यात आलं.

Share