नक्षलवाद्यांनी लपवलेली शस्त्रे पोलिसांनी शोधली
गोंदिया 10 : संवेदनशील व नक्षल प्रभावित गोंदिया जिल्ह्याच्या देवरी तालुक्यातील बटुकचूहा वनपरिक्षेत्रात पोलीस प्रशासनाला मोठे यश मिळाले आहे. बुधवार, 8 सप्टेंबर रोजी नक्षलवाद्यांनी लपविलेली शस्त्रे पोलिसांनी शोधले आहेत. ही कारवाई जिल्हा पोलिसांनी केली नसून एसआयडीने केल्याची माहिती एलसीबी व नक्षल सेलचे पोलीस निरिक्षक बबन आव्हाड यांनी दिली.दरम्यान एसआयडीचे पोलीस निरिक्षकाना विचारण्याकरीता संपर्क केला असता प्रतीसाद मिळाला नाही.
माओवाद्यांनी एखादी मोठी घटना घडवून आणण्याचा बेत आखला होता. तसेच गरजेच्या वेळी उपयोगात आणण्यासाठी घातक शस्त्रे सुरक्षित ठिकाणी लपवून ठेवले होते. मात्र योग्यवेळी पोलिसांनी शोध घेवून ते ताब्यात घेतले. गुरुवार, 9 सप्टेंबर रोजी याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला.
सालेकसा पोलिसांना नक्षल चळवळीची माहिती गुप्तचरांनी दिली. त्यानंतर 8 सप्टेंबरच्या दुपारी सालेकसा ठाण्यापासून 30 किमी दूर अंतरावर देवरी तालुक्याच्या बटुकचुहा जंगलात शोध मोहीम राबविण्यासाठी पोलीस जवान रवाना झाले. पोलिसांनी चालविलेल्या या सर्च अभियानात जुनी 9mm कार्बाइन मशीन गन (मॅगजीनसह), 9 एमएमची एक खाली केस व त्याच्या आत एक बुलेट आढळली. तसेच एक लाकडी रायफलचा बट सुद्धा आढळला. या शस्त्रांना ताब्यात घेत पोलीस सुरक्षा दलाने या भागात सर्च अभियान तीव्र केले आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, या भागात सक्रिय नक्षली दलमचा उद्देश्य भारत सरकार विरुद्ध षडयंत्र रचण्याचा आहे. तसेच घात लावून पोलीस टीमवर हल्ला करण्याच्या उद्देशाने ही शस्त्रे लपवून ठेवण्यात आले होते, असे संगितले जाते.
या प्रकरणात सालेकसा पोलीस ठाण्यात फिर्यादी पोलीस अधिकारी यांच्या तक्रारीवर गडचिरोली जिल्ह्याच्या भामरागड भागात सक्रिय डीव्हीसी नक्षल कमांडर देवचंद उर्फ नरेश उर्फ चंदू, तथा गडचिरोली नक्षल डिविजनच्या रांनो उर्फ रामे नरोटे व त्यांच्या इतर 6 नक्षल सोबत्यांविरुद्ध कलम 3/25 शस्त्र अधिनियम (आर्म अॅक्ट) सहकलम 18, 20, 23 बेकायदेशीर हालचाल प्रतिबंधक कायद्यान्वये गुरुवार, 9 सप्टेंबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला मात्र पोलीस प्रेसनोट मध्ये उल्लेख नाही.