जुगार अड्ड्यावर धाड | ₹3.99 लाखांचा माल जप्त; 6 जणांना अटक
अर्जुनी-मोरगाव : गोंदिया गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक मनोज भास्करराव उघडे यांनी वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालयासमोरील इमारतीच्या छतावर सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर धाड घातली. यात पोलिसांनी 6 जणांना अटक करून तब्बल ₹3.99 लाखांचा माल जप्त केला.
पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार, गोंदिया गुन्हे शाखा पोलिसांना 5 सप्टेंबरच्या रात्री 2 वाजता शहरातील वन विभागाच्या कार्यालयासमोरील एका इमारतीच्या छतावर जुगार अड्डा सुरू असल्याची गोपनीय माहिती मिळाली. या माहितीच्या आधारावर पोलीस उपनिरीक्षक मनोज उघडे यांच्या नेतृत्वात अर्जुनी-मोरगाव पोलिसांनी जुगार अड्ड्यावर धाड मारली. तेथे 52 ताशपत्तीवर पैशाच्या हार-जीतच्या जुगाराचे खेळ सुरू होते.
पोलिसांनी घटनास्थळावरून अर्जुनी-मोरगाव येथील रहिवासी आरोपी प्रजेश अशोक कोरे (27), मंगेश मारूती हरने (34), राकेश आत्माराम डोंगरवार (35), लोकेश उमेश क्षीरसागर (26) व बोंडगांवदेवी येथील रहिवासी विश्राम शंकर रामटेके (42), विकास रामप्रसाद बरैया (36) यांना अटक केली. तसेच माल जप्त केला. पोलिसांनी आरोपींची झडती घेवून 50 रुपये किंमतीचे ताशपत्ते, 8 हजार रुपये नगदी, 4 मोटर सायकल, 5 मोबाइल असा एकूण 3 लाख 99 हजार 050 रूपयांचा माल जप्त केला.
पोलीस उपनिरीक्षक यांच्या तक्रारीवरून आरोपींविरुद्ध महाराष्ट्र जुगारबंदी कायद्याच्या कलम 4, 5 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. तपास पोलीस निरीक्षक सतीश जाधव यांच्या मार्गदर्शनात रमेश सेलोकर व मडावी करीत आहेत.