दीड महिन्यात तब्बल ३० लाख व्हॉट्सॲप अकाऊंटवर बंदी
वृत्तसंस्था / मुंबई : सुरक्षेच्या कारणास्तव व्हॉट्सॲप ने १६ जून ते ३१ जुलै या दीड महिन्याच्या कालावधीत तब्बल ३० लाख २७ हजार अकाऊंटवर बंदी आणली आहे. तसेच एकूण ५९४ अकाऊंटच्या तक्रारी आल्याअसून त्यावर काय कारवाई करायची याचा विचार सुरु असल्याचे व्हॉट्सॲप ने आपल्या अहवालात स्पष्ट केले. त्या आधी १५ मे ते १५ जून या एक महिन्याच्या कालावधीत व्हॉट्सॲप ने २० लाख अकाऊंटवर बंदी आणली होती.
व्हॉट्सॲप ने जारी केलेल्या अहवालात सांगितलं आहे की, भारतीय फोन क्रमांकाची ओळख ही +९१ या क्रमांकावरुन केली जाते. ऑटोमेटेड किंवा बल्क मेसेंजिग म्हणजे स्पॅमच्या चुकीच्या वापराबद्दल जवळपास ९५ टक्के अकाऊंटवर बंदी आणण्यात आली आहे असे व्हॉट्सॲप ने सांगितले आहे. जगभराचा विचार करता सुरक्षेच्या कारणास्तव आणि गैरवापराला आळा घालण्यासाठी व्हॉट्सॲप कडून दर महिन्याला सरासरी ८० लाख अकाऊंटवर बंदी आणली जाते असे या अहवालातून स्पष्ट होत आहे .