अमेरिकेनं अफगाणिस्तानची भूमी सोडली, तालिबानचा आनंद व्यक्त करण्यासाठी रात्रभर गोळीबार

अमेरिकेने अफगाणिस्तानातून माघार घेण्याची प्रक्रिया पूर्ण केली असल्याची माहिती सोमवारी (30 ऑगस्ट) पेंटागॉनने दिली. हजारो अमेरिकन लोकांना बाहेर काढण्याची प्रक्रिया पार पाडल्यानंतर ही घोषणा करण्यात आली. 

तब्बल वीस वर्षांच्या संघर्षानंतर अमेरिकेनं अफगाणिस्तानची भूमी सोडली आहे. तालिबान्यांनी हवेत गोळीबार करत अमेरिकेच्या या माघारीचा आनंद साजरा केला. अफगाणिस्तानातून बाहेर पडण्यासाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी 31 ऑगस्ट ही कालमर्यादा निश्चित केली होती. या तारखेच्या एक दिवस आधीच अमेरिकेनं आपली बाहेर पडण्याची प्रक्रिया पूर्ण झाली असल्याचं जाहीर केलं. गेल्या महिन्याभरात तालिबानने केलेली आगेकूच आणि नंतर काबुलचा घेतलेला ताबा या पार्श्वभूमीवर जो बायडन यांच्या घाईघाईने बाहेर पडण्याच्या निर्णयावर डेमोक्रॅट्स आणि रिपब्लिकन दोघांनी टीका केली होती.

माघार घेण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्याची माहिती यूएस सेंट्रल कमांडचे कमांडर जनरल फ्रँक मॅकेन्झी यांनी दिली. अमेरिकेचे अफगाणिस्तानमधील राजनयिक अधिकारी रोस विल्सन हे C-17 या विमानातून परतणारे शेवटचे व्यक्ती होते, असंही मॅकेन्झी यांनी सांगितलं. ऑगस्ट 14 पासून काबुलमधून जवळपास 1 लाख 22 हजारांहून अधिक लोकांना एअरलिफ्ट करून बाहेर काढण्यात आलं आहे, ज्यामध्ये सहा हजार अमेरिकेन नागरिकांचाही समावेश होता.

2001 मध्ये अमेरिकेच्या नेतृत्वाखाली अफगाणिस्तानमध्ये आलेल्या फौजांनी तालिबानला सत्तेवरून हटवलं होतं, त्यानंतर वीस वर्षांनी तालिबानने पुन्हा पूर्ण देशाचा ताबा घेण्यात यश मिळवलं.

Share